तामिळनाडूत एका दांपत्याची हत्या करण्यात आली आहे. महिला तीन महिन्यांची गरोदर होती. आंतरजातीय विवाह केल्याने ही हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. काही अज्ञातांनी हल्ला करत दांपत्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीच्या वडिलांना अटक केली आहे. तामिळनाडूच्या थुथूकुडी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. हे ऑनर किलिंग असावं असा पोलिसांचा संशय आहे.

जर पोलिसांनी संशय व्यक्त केल्याप्रमाणे हे ऑनर किलिंग असल्यास तर एका आठवड्यातील ही दुसरी घटना असेल. याआधी २५ जुलै रोजी कोईम्बतूर येथे आंतररजातीय विवाह करणाऱ्या दांपत्याची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दोन्ही पीडितांची ओळख पटवली अशून सोलईराजन आणि जोथी अशी त्यांची नावे आहेत. दोघेही मिठागरात रोजंदारीवर काम करत होते.

‘सोलईराजन आणि जोथी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघेही एकाच ठिकाणी काम करत असल्याने त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतली. जोथीच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता. यामुळे तिने घऱ सोडलं आणि एप्रिल महिन्यात सोलईराजनसोबत लग्न केलं. सोलईराजन याच्या कुटुंबाने मात्र काही विरोध केला नाही. त्यांची या लग्नासाठी संमती होती’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोलईराजन याच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत हत्येच्या संशयाखाली जोथीच्या वडिलांना अटक केली. सोलईराजन आणि जोथी गुरुवारी सकाळी कोणालाच दिसले नव्हते. त्यांच्या घराचा दरवाजाही बंद होता. सोलईराजन याच्या आईने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला असता हत्या झाल्याचं उघड झालं.

‘जेव्हा आम्ही दरवाजा उघडला तेव्हा दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. ते पाहून आम्हाला खूप मोठा धक्का बसला. त्यांच्या शरिरावर सगळीकडे जखमा होत्या’, असं एका नातेवाईकाने सांगितलं आहे. ‘हत्या केल्यानंतर आरोपींना पळ काढला. मुलीच्या कुटुंबाचा लग्नाला विरोध होता असं आम्हाला कळलं आहे. म्हणूनच आमचा त्यांच्यावर संशय आहे’, असं पोलिसांनी सांगितलं आहे.