मुलांसाठी बाप काहीही करु शकतो असं म्हणतात. मात्र तामिळनाडूमध्ये याच वाक्याच्या अगदी उलट प्रकार समोर आला असून घडलेली घटना ही एकाद्या कॉमेडी चित्रपटाची पटकथा होऊ शकते अशी आहे. न्यू वाशेरमनपेठ येथील दोन भावांना पोलिसांनी अटक केली असून हे दोघेजण वडिलांना चित्रपट बनवण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने चक्क बकऱ्या चोरुन विकायचे अशी माहिती समोर आली आहे. व्ही. निरंजन कुमार (३०) आणि त्याचा भाऊ लेनिन कुमार (३२) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघे मागील तीन वर्षांपासून बकऱ्या चोरी करायचे अशी माहिती माधवाराम पोलीस स्थानकातील पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. या दोघांनाही शनिवारी अटक करण्यात आली.

निरंजन आणि लेनिन दिवसाला आठ ते दहा बोकड/बकऱ्या चोरायचे आणि नंतर ते बाजारामध्ये प्रत्येकी आठ हजारांना विकायचे. चेंगलपेठ, माधवाराम, मिंजूर आणि पोन्नेरी सारख्या ग्रामीण भागामध्ये हे दोघे भाऊ गाडीमधून फिरायचे. रस्त्याच्या बाजूला चरण्यासाठी सोडलेल्या बकऱ्या हे लोकं चोरायचे. बकऱ्यांच्या आजूबाजूला त्यांच्यावर देखरेख करणारं कोणीच नसल्याचं समल्यास हे दोघे बकऱ्या गाडीत टाकून घटनास्थळावरुन पळ काढायचे. एका कळपातील दोन ते तीन पेक्षा अधिक बकऱ्या चोरायचा नाही असा त्यांनी नियमच केला होता.

त्यामुळेच एखादी बकरी चोरीला गेल्याची कोणी पोलिसांकडे तक्रार करायचं नाही. मात्र  ९ ऑक्टोबर रोजी त्यांनी पिलानि येथून एक बकरी चोरली आणि त्यांच्या दुर्देवाने या भागामध्ये केवळ सहाच बकऱ्या असल्याने ही चोरी मालकाच्या लक्षात आली. त्यामुळेच मालकाने पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली. तक्रारीनुसार पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून पाहिले असता बकरी चोरणारे चारचाकी गाडीमधून येत असल्याचे दिसले. मात्र या गाडीचा क्रमांक सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत नव्हता. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता या परिसरामध्ये सातत्याने एक किंवा दोन बकऱ्या चोरीला जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी साध्या वेशातील पोलीस नियुक्त केले. याच पोलिसांनी दोन भावांना बकऱ्या चोरताना रंगेहाथ पकडलं.

पोलिसांनी चौकशी केली असता या चोरीपेक्षा चोरीचे कारण जास्तच आश्चर्यचकित करणारं होतं. या दोघांचे वडील विजय शंकर हे ‘नी ताना राजा’ नावाचा चित्रपट तयार करत होते. या चित्रपटामध्ये दोन्ही भाऊ प्रमुख भूमिका साकारणार होते. मात्र आर्थिक चणचण निर्माण झाल्याने या चित्रपटाचे चित्रिकरण अर्ध्यात थांबवण्यात आलं होतं. म्हणूनच वडिलांना मदत करण्यासाठी या दोघांनी बकऱ्या चोरण्यास सुरुवात केली.