तामिळनाडूमधील पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठातील डॉक्टरांनी एका गाईवर शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातून चक्क ५२ किलो प्लास्टिक बाहेर काढले आहे. या गायीवर डॉक्टरांनी पाच तास शस्त्रक्रिया केली.

‘द हिंदू’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार तिरुमुलेवॉयल या गावातील एका गायीवर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रिया करण्यात आलेली गाय मागील अनेक दिवसांपासून आपला पाय पोटावर मारायची. हळूहळू या गायीचे दूधही कमी होऊ लागल्याचे गायीचे मालक असणाऱ्या पी मुनीरत्नम यांच्या लक्षात आले. त्यानंतर या गायीला पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात दाखल करण्यात आले आणि तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या गायीच्या पोटातून ५२ किलो प्लास्टिक बाहेर काढण्यात आले.

“सामान्यांकडून मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे आणि योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावले जाणारे प्लास्टिक कशाप्रकारे प्राण्यांसाठी घातक ठरु शकते याचे हे योग्य उदाहरण आहे. याआधीही आम्ही गायीच्या पोटामधून प्लास्टिक बाहेर काढले आहे. मात्र यावेळी गायीच्या पोटात चक्क ५२ किलो प्लास्टिक सापडल्याने आम्हालाही धक्का बसला,” अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे संचालक एस. बालसुब्रमण्यम यांनी दिली आहे.

मुनीरत्नम यांनी ही गाय सहा महिन्यापूर्वी वेल्लोर येथून विकत आणली होती. २० दिवसापूर्वीच या गायीने एका वासराला जन्म दिला आहे. असं असलं तरी ही गाय दर दिवशी फक्त तीनच लिटर दुध देत असल्याचे मुनीरत्नम यांच्या लक्षात आले. तसेच या गाईला मृत्रविसर्जनला त्रास होत असल्याचे त्यांना जावणले. त्यानंतर त्यांनी जनावरांच्या डॉक्टरांना दाखवले. मात्र त्यांनी तामिळनाडूमधील पशुवैद्यकीय आणि प्राणी विज्ञान विद्यापीठात दाखल करण्याचा सल्ला दिला.

“या गाईच्या चाचण्या करण्यात आल्या त्यावेळी तिच्या पोटामध्ये प्लास्टिक असल्याचे आम्हाला समजले. आम्ही या गाईचे एक्स रे काढले आणि इतरही चाचण्या केल्या तेव्हा तिच्या पोटातील ७५ टक्के भागात प्लास्टिक असल्याचे दिसून आले. हे प्लास्टिक मागील दोन वर्षांच्या काळात साठले होते,” अशी माहिती विद्यापिठातील प्राध्यापक असणाऱ्या पी. सेल्वाराजा यांनी दिली. अखेर डॉक्टरांनी शुक्रवारी या गायीवर शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेतला. सकाळी अकरा वाजता सुरु झालेली ही शस्त्रक्रीया दुपारी साडेचार वाजता संपली.

विशेष म्हणजे हे सरकारी रुग्णालय असल्याने या शस्त्रक्रियेसाठी मुनीरत्नम यांना केवळ ७० रुपये खर्च आला. २० रुपये नोंदणी खर्च आणि ५० रुपये शस्त्रक्रियेच्या खर्चाचा यामध्ये समावेश आहे. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेला ३५ हजार खर्च आला असता अशी माहिती एस. बालसुब्रमण्यम यांनी दिली.