पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची धमकी दिल्याप्रकरणी कोईम्बतूर पोलिसांनी १९९८ च्या बॉम्बस्फोट खटल्यात दोषी ठरलेल्या मोहम्मद रफिकला अटक केली. मोहम्मद रफिकने एका ट्रकचालकाशी फोनवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा उल्लेख केला होता. ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रफिकला अटक केली.

कोईम्बतूरमधील १९९८ च्या बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा भोगून बाहेर आलेला मोहम्मद रफिक सध्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसाय करतो. रफिक काही दिवसांपूर्वी ट्रकचालक प्रकाशशी बोलत होता. नवीन गाड्यांच्या खर्चाबाबत त्या दोघांमघ्ये चर्चा सुरु होती. मात्र, चर्चेदरम्यान रफिक पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत बोलू लागला. ‘१९९८ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांच्या कोईम्बतूर भेटीदरम्यान ज्याने बॉम्ब ठेवला होता त्याची मदत मी घेणार आहे. नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे त्याने प्रकाशला सांगितले. माझ्याविरोधात टाडा, गुंडा अॅक्ट अशा विविध कायद्यांखाली गुन्हे दाखल असल्याचे रफिकने म्हटले होते. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सालेम आणि परिसरात व्हायरल झाली होती. अखेर पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली.

सोमवारी पोलिसांनी मोहम्मदला अटक केली असून न्यायालयाने त्याला १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोईम्बतूरमध्ये फेब्रुवारी १९९८ मध्ये बॉम्बस्फोट झाले होते. या स्फोटांमध्ये ५८ जणांचा मृत्यू झाला होता. या खटल्यात मोहम्मद दोषी ठरला होता. शिक्षा भोगून तो आता तुरुंगातून बाहेर देखील आला होता.