03 March 2021

News Flash

‘डीएमके’त स्टालिन पर्वाची सुरुवात, पक्षाच्या अध्यक्षपदी निवड

करुणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाची धूरा त्यांचे पूत्र स्टालिन यांच्याकडे सोपवली जाईल, हे स्पष्ट होते. मंगळवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली.

एम. करुणानिधी यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघमच्या (द्रमुक) अध्यक्षपदी त्यांचे पुत्र एम के स्टालिन यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून करुणानिधी यांना भारतरत्न देण्याची मागणीही या प्रसंगी करण्यात आली.

करुणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाची धूरा त्यांचे पूत्र स्टालिन यांच्याकडे सोपवली जाईल, हे स्पष्ट होते. मंगळवारी पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. अपेक्षेनुसार या बैठकीत स्टालिन यांची पक्षाध्यक्षपदावर निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर दुरई मुरुगन यांची पक्षाच्या खजिनदारपदी निवड करण्यात आली.

पक्षाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्टालिन यांनी करुणानिधी आणि अण्णादुराई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या बैठकीत करुणानिधी यांना भारतरत्न पुरस्कार देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला.

दरम्यान, करुणानिधी ह्यात असतानाच त्यांचे पुत्र स्टालिन आणि अळगिरी यांच्यात पक्षातील वर्चस्वावरुन वाद निर्माण झाला होता. अळगिरी यांची २०१४ मध्ये पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. द्रमुक म्हणजे काही मठ नाही की जेथे धर्मगुरु त्याचा उत्तराधिकारी जाहीर करेल, असे विधान त्यांनी केले होते. करुणानिधी यांच्या निधनानंतर हा वाद शिगेला पोहोचला. करुणानिधी यांच्या निधनाच्या काही दिवसांनंतर अळगिरी यांनी पक्षातील निष्ठावंतांचा त्यांना पाठिंबा असल्याचा दावा केला होता. आता स्टालिन यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अळगिरी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 11:20 am

Web Title: tamilnadu dmk general council meet in chennai mk stalin elected as president
Next Stories
1 जर्मनी : दुसऱ्या महायुद्धातील 500 किलोचा जिवंत बॉम्ब सापडला
2 सुब्रमण्यम स्वामींच्या ट्विटवर मालदीव संतप्त, भारतीय उच्चायुक्तास समन्स
3 Kerala Flood: नासाने प्रकाशित केलेले पुरानंतरचे ‘हे’ फोटो पाहून तुम्हाला धक्का बसेल
Just Now!
X