तामिळनाडूमधील त्रिची येथे राहाणाऱ्या २३ वर्षीय तरुणाने प्लॅस्टिकवर बंदी लागू करण्यासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली. पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत तो खूपच गंभीर होता आणि पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी काहीही करण्यास तयार होता. परंतु त्याचे हे वागणे त्याच्या आजुबाजुचे लोक फार गांभीर्याने घेत नसत. पण या कारणासाठी खरोखरच तो एक दिवस आत्महत्या करेल असे कुणाला वाटले नव्हते. के. जवाहर नावाच्या या तरुणाने तंजावूरमधील एका कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात म्हटले आहे. त्याच्या अंत्यसंस्कारापर्यंतदेखील कुटुंबियांना त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नव्हते. त्याच्या वडिलांनी एका व्यक्तिच्या फोनमध्ये पाहिलेल्या व्हिडिओवरून त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा खुलासा झाला. प्लॅस्टिकच्या वापरामुळे होत असलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासाविषयीचा संदेश समाजात पोहोचावा म्हणून आपण एवढे मोठे पाऊल उचलत असल्याचे त्याने स्वत:चं चित्रीत केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.
१० वीपर्यंत शिकलेल्या जवाहरला पर्यावरणाविषयी विशेष प्रेम होते. प्लॅस्टिक आणि अन्य गोष्टींमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या नुकसानाबाबत तो कायम चिंतेत असे. याविषयी तो लोकांना सतत जागृत करत असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या विरोधात त्याने अनेक निदर्शने केली होती. एकदा तर तंजावूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढ्यात तो धरणे द्यायला बसला होता. प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी आणण्याविषयी लोकांचे ध्यान केंद्रित करण्यासाठी त्याने हे पाऊल उचलले होते.
व्हिडिओ क्लिपमध्ये काय आहे.
प्लॅस्टिकवर बंदी आणण्यासाठी मी आत्महत्या करत आहे. १२९ कोटी लोकांच्या फायद्यासाठी आपले आयुष्य संपविणे यात काहीही चुकीचे नाही. हा माझा स्वताचा निर्णय आहे. मी गप्प बसून राहू शकत नाही, असे त्याने व्हिडिओमधील संदेशात म्हटले आहे.
पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी अनेकवेळा जवाहरला हे सर्व सोडून कुटुंबात लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला होता. जवाहरचे वडील खाजगी विधी महाविद्यालयात सुरक्षारक्षक असून, सोमवारी सकाळपासूनच गायब झालेल्या जवाहरसाठी ते चिंतीत होते. दिवसभर ते मुलाचा शोध घेत असताना, एका तरुणाने कालव्यात उडी मारून आत्महत्या केल्याचे वृत्त त्यांच्या कानावर आले. तपासाअंती आत्महत्या करणारा तरूण जवाहरच असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.