टांझानियाच्या युवतीवर जमावाने केलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका भाजपचा सदस्य असल्याची माहिती पुढे आली आहे. ‘हिंदुस्थान टाईम्स’ने या संदर्भात वृत्त दिले असून त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. लोकेश बांगरी असे या सदस्याचे नाव असून, तो चिक्काबनवारा ग्राम पंचायतीचा सदस्य आहे. ही घटना ज्या ठिकाणी घडली होती, तेथून पोलिसांनी एक ओळखपत्र जप्त केले. त्या आधारावर त्यांनी लोकेश बांगरी याला अटक केली असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान, लोकेश बांगरी याचा मित्र आणि ग्राम पंचायत सदस्य कबीर अहमद याने बांगरी पूर्णपणे निर्दोष असल्याचे म्हटले आहे. घटना घडली त्यावेळी लोकेश बांगरी तिथे उपस्थित होता. मात्र, तो जमावाला रोखण्याचा प्रयत्न करून पीडित तरुणीला मदत करण्याचा प्रयत्न करीत होता. पण जमाव खूपच संतप्त असल्यामुळे त्याला मदत करता आली नाही. यावेळी झालेल्या झटापटीतच त्याचे पाकिट आणि ओळखपत्र तिथे पडले आणि ते पोलिसांना मिळाले, असे कबीर अहमदने म्हटले आहे.
गेल्या रविवारी बंगळुरूमध्ये एका वाहनाने धडक दिल्याने रस्त्यावर ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने या वाहनाच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या वाहनातील २१ वर्षीय टांझानियाच्या विद्यार्थिनीवर हल्ला केला होता. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून केंद्रीय गृह मंत्रालयाने कर्नाटक सरकारला अहवाल सादर करण्यास सांगितला आहे. तसेच, या प्रकरणातील आरोपींबाबत काय कारवाई करण्यात आली आणि संबंधित युवतीला सुरक्षा देण्यात आली का? याबाबत माहिती मागविण्यात आली आहे.