बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘रश्मि रॉकेट’चा एडिटर अजय शर्माचे करोनामुळे निधन झाले आहे. ४ मे रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. अजयच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याला श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत.

निधनाच्या १० दिवस आधी चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्वीट करत अजयसाठी ऑक्सिजन आणि बेडसाठी मदत मागितली होती. त्यांनी ट्वीटमध्ये अजयच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ८३ वर पोहोचली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयचा दाखल करण्यात आले होते. पण ४ मे रोजी अजयचे निधन झाले आहे.

श्रिया पिळगावकरने ट्वीट करत अजयला श्रद्धांजली वाहिली आहे. ‘मला अतिशय दु:ख झाले. आपण अजयला गमावले. तो केवळ एक एडिटर नव्हता तर माणूस म्हणून देखील चांगला होता’ असे श्रियाने ट्वीटमध्ये म्हटले आहे. फिल्म एडिटर टी सुरेशने देखील श्रद्धांजली वाहिली आहे.

अजय शर्माने रश्मि रॉकेट पूर्वी ‘जग्गा जासूस’, ‘कारवां’, ‘लूडो’, ‘इंदू की जवानी’, ‘हायजॅक’, ‘प्यार का पंचनामा 2’, ‘क्रूक’, ‘तुम मिले’ अशा अनेक चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. तसेच त्याने काही वेब सीरिजचे देखील एडिटिंग केले आहे. अजयने बर्फी, ये जवानी है दिवानी, अग्न‍िपथ, काई पो चे, लाइफ इन ए मेट्रो, गोरी तेरे प्यार में, आई हेट लव स्टोरीज आणि द डर्टी पिक्चर चित्रपटांसाठी सहाय्यक एडिटर म्हणून काम केले होते.