जागतिक योग दिवस मोठ्या तयारीनीशी साजरा करण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. नवी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱया कार्यक्रमात जगातील १०० देशांच्या प्रतिनिधींना एकाच छताखाली आणून योग साधना करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. उद्दीष्ट साध्य झाल्यास यातून जागतिक विक्रमाचा दावा देखील करण्यात येणार आहे.
२१ जून रोजी राजपथावर सकाळी सात वाजल्यापासून सुरू होणाऱया अर्ध्यातासाच्या योग शिबिरात ४० हजार जण एकाच वेळी योगासने करणार आहेत. यासोबतच जगातून जवळपास १०० देशांचे प्रतिनिधी देखील या योग शिबीराला उपस्थित राहतील असे लक्ष्य कार्यक्रमाच्या आयोजकांनी ठेवले आहे. जगातील १०० देशांचे राष्ट्रीयत्व असलेले लोक एकाच ठिकाणी जमून योगासने केल्याची नोंद ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये करण्याचा दावा यावेळी केला जाणार आहे. आयुष मंत्रालय या कार्यक्रमाचे आयोजन करणार असून जमणाऱया परदेशी प्रतिनिधींसह स्वसंसेवकांची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेहरु युवा केंद्र संघटनच्या(एनवायकेस) खांद्यावर आहे.