४जीच्या आखाड्यात एकमेकांना चीतपट करण्यासाठी भारतीय बाजारपेठेत मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांची स्पर्धा तीव्र झाली आहे. मात्र मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्यांमधील स्पर्धेचा मोठा फायदा फेसबुकला होताना दिसतो आहे. ४जी सेवा देणाऱ्या कंपन्या दिवसागणिक नवे नवे प्लान्स बाजारात आणताना त्याची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करत आहेत. या जाहिरातींसाठी फेसबुकचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आहे. त्यामुळे फेसबुकला कोट्यवधींचा फायदा झाला आहे.

४जी सेवेचे नवे प्लान्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आणि आयडियामध्ये चढाओढ सुरू आहे. नव्या प्लान्सची माहिती लोकांना मिळावी आणि त्यामुळे ग्राहकसंख्येत वाढ व्हावी, या उद्देशाने एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आणि आयडिया या कंपन्यांकडून फेसबुकवरुन नव्या ४जी प्लान्सची माहिती दिली जाते आहे. नवे ४ जी प्लान्स लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चारही मोबाईल सेवा पुरवठादार कंपन्या मोठ्या प्रमाणावर फेसबुकचा वापर करत आहेत. त्यामुळे फेसबुकला प्रचंड मोठा फायदा झाला आहे.

४जी सेवा देणाऱ्या मोबाईल कंपन्या जाहिरात करण्यासाठी फेसबुकचा आधार घेत आहेत. याशिवाय मोबाईल कंपन्यांमधील स्पर्धेमुळे ४जी सेवेचे दर घसरत असल्याने लोकांनी मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे फेसबुकचा वापरदेखील वाढला आहे. यामुळे फेसबुकला दुहेरी नफा मिळतो आहे. ‘चौथ्या आर्थिक तिमाहीत आम्हाला भारतात जाहिरातींच्या माध्यमातून मोठा नफा झाला आहे. अनेक कंपन्यांच्या डेटा प्लान्सच्या जाहिराती फेसबुकच्या माध्यमातून केल्या जात असल्याने एशिया पॅसिफिक विभागात, विशेषत: भारतात प्रचंड नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत हा नफा जास्त आहे,’ असे फेसबुकचे मुख्य आर्थिक अधिकारी डेविड वेहनेर यांनी म्हटले आहे.

भारतातील सर्वात मोठी मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी असलेल्या एअरटेलचा नफा गेल्या तिमाहीत तीन टक्क्यांनी कमी झाला आहे. गेल्या वर्षी आर्थिक तिमाहीत एअरटेलला एकत्रित २४,१०३ कोटींचा नफा झाला होता. यंदाच्या तिमाहीत नफ्याचा आकडा २३,३६४ हजार कोटींवर आला आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची मोबाईल कंपनी असलेल्या आयडिया सेल्युलरच्या नफ्यात तब्बल ८८ टक्क्यांनी घट झाली आहे. आयडिया सेल्युलरचा नफा ९१.४६ कोटींवर आला आहे. रिलायन्स जिओच्या आव्हानाला टक्कर देताना व्होडाफोनच्या नफ्यावरही परिणाम झाला आहे.

४जी सेवेच्या युद्धात मोबाईल कंपन्या घायाळ होताना फेसबुकच्या नफ्यात ५१ टक्क्यांची वाढ झाली आहे. फेसबुकच्या वापरकर्त्यांची संख्या १.९ बिलीयन इतकी आहे. यातील १.२ बिलीयन लोक दररोज फेसबुकचा वापर करतात. यामधील १.१ बिलीयन लोक मोबाईलवरुन फेसबुकचा वापर करतात.