बलात्कार, लंगिक शोषण आणि कनिष्ठ सहकारी महिलेचा विनयभंग असे आरोप ठेवण्यात आलेला तहलकाचा संपादक तरुण तेजपाल याला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्याने जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने याबाबतची सुनावणी पुढे ढकलली आहे.
गोवा खंडपीठाच्या न्यायाधीश मृदुला भाटकर यांच्यासमोर मंगळवारी तेजपालच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मंगळवारी कोणताही निर्णय न देता या प्रकरणाची पुढील सुनावणी ४ मार्च रोजी घेण्याचे न्यायालयाने ठरवले आहे. तेजपालने स्थानिक न्यायालयात जामिनाबाबत अर्ज करावा आणि त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या आरोपपत्राची प्रत गोवा पोलिसांच्या गुन्हे विभागाने न्यायालयासमोर सादर करावी, असे आदेशही देण्यात आले आहेत.
आरोपांमागे राजकीय सूडचक्र
दरम्यान, याप्रकरणी आपल्याविरोधात राजकीय सूडचक्र असल्याचा आरोप तहलकाचा संपादक तरुण तेजपाल याने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन नाकारण्यात आल्यानंतर आपण निर्दोष असल्याचाच दावा तेजपाल याने केला. आपण पूर्णपणे निर्दोष असून आपण काहीही चुकीचे वागलेलो नाही. या प्रकरणी आपला हात नसल्याचा दावा करून आपल्याला राजकीय सूडचक्रातून गुंतविण्यात आले असल्याचा आरोप तेजपालने केला. ‘सीसीटीव्ही’ मध्ये संपूर्ण सत्य असून त्याद्वारेच जगाला खरे काही समजेल, असे तेजपालने सांगितले.