07 March 2021

News Flash

तेजपाल यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांनाा पोलिसांसमोर हजर होण्यास मुदतवाढ नाकारण्यात आली.

| November 29, 2013 12:42 pm

सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांनाा पोलिसांसमोर हजर होण्यास मुदतवाढ नाकारण्यात आली. त्यामुळे गुरुवारी दुपारऐवजी शुक्रवारी तेजपाल गोवा पोलिसांसमोर हजर होतील. तेजपाल यांनीच फॅक्स पाठवून आपण हजर होत असल्याबद्दल पोलिसांना माहिती दिली. आपण गोव्याचे रहिवासी नसल्याने आपल्याला हजर होण्यास वेळ लागत आहे, मात्र शुक्रवारी आपल्यासमोर हजर झाल्यानंतर तपासकामात मी सर्वतोपरी सहकार्य करेन, असे आश्वासनही तेजपाल यांनी पत्रात दिले आहे. याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज तेजपाल यांनी मागे घेतला.
दरम्यान, हजर होण्याची मुदत उलटूनही तेजपाल पोलिसांना शरण न आल्याने गोवा पोलिसांनी तेजपालविरोधात अटक वॉरंट काढण्यास न्यायालयाकडे अनुमती मागितली आहे.
तर तहलकाच्या व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या गोवा येथील प्रमुख शमिना शफिक यांची भेट घेऊन ‘महिलेवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकारास’ तहलका व्यवस्थापन कसा प्रतिसाद देणार आहे, याचा तपशील त्यांना सांगितला.
पोलिसांच्या स्वाधीन होण्यासाठी  तेजपाल यांनी येत्या शनिवापर्यंत अवधी देण्यासंबंधी केलेली विनंती गोवा पोलिसांनी फेटाळून लावली असून त्यांना अटक केली जाण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, तरुण तेजपाल हे तरुणीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी आढळल्यास कायदा आपला मार्ग अनुसरेल, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे स्पष्ट करून तेजपाल यांना आपण वाचवीत असल्याचा भाजपने केलेला आरोप केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी गुरुवारी फेटाळून लावला.
तरुण तेजपाल यांना गुरुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत गोवा पोलिसांसमोर हजर होण्याची सूचना देण्यात आली होती. मात्र या मुदतीत तेजपाल हजर झाले नाहीत. दुपारी तीननंतर ते हजर न झाल्यामुळे गोवा पोलिसांनी आपली पावले उचलण्यास प्रारंभ केला.
तेजपाल यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरण्ट जारी करण्यात आले आहे की नाही, याबद्दल नेमकेपणाने न सांगता जे काही तत्त्वास आणि कायद्याच्या अखत्यारीस धरून राहील, त्यानुसार कारवाई आधीच सुरू करण्यात आली आहे, असे गोव्याचे पोलीस महासंचालक ओ.पी. मिश्रा यांनी सूचित केले.
सिब्बल यांचे स्पष्टीकरण
तरुण तेजपाल यांच्यावर लैंगिक अत्याचारप्रकरणी ठेवण्यात आलेल्या आरोपांसदर्भात कायद्याच्या तरतुदींनुसार कारवाई व्हायलाच हवी आणि तेजपाल दोषी आढळल्यास त्यांना शिक्षा व्हायला हवी, असे स्पष्ट मत केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले. तेजपाल यांना आपण वाचवीत असल्याचा भाजपने केलेला आरोप त्यांनी फेटाळून लावला.
तरुण तेजपाल यांना आपण वाचवीत नाही आणि त्यांच्या कंपनीत आपले समभाग असल्यासंबंधी भाजपने केलेला आरोपही सिब्बल यांनी फेटाळून लावला. तहलकाच्या समभागांसाठी आपण केव्हाही अर्ज केला नव्हता आणि ‘तहलका’साठी दिलेली पाच लाख रुपयांची देणगी केवळ मतस्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी होती, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 12:42 pm

Web Title: tarun tejpal will be arrested any time
टॅग : Tarun Tejpal
Next Stories
1 हदौटीत उमेदवारांचा भर जातीपातींची समीकरणे जुळविण्यावर
2 जबाबदाऱ्या पार पाडण्यात काँग्रेस अयशस्वी -मोदी
3 दिल्लीत भाजपला बहुमतच -गडकरी
Just Now!
X