31778f72e21945f2b7fc190eba0
गेल्या आठवड्यात कॅलिफोर्नियात घडलेल्या घटनेत अंदाधुंद गोळीबार करत १४ लोकांना मृत्यूच्या खाईत उतरविणाऱ्या तश्फीन मलिकने पाकिस्ताच्या मुल्तानमधील अल-हुदा मदरशात शिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. केवळ मुलींसाठी असलेल्या या मदरशाच्या मौलवींनी हा खुलासा केला आहे. अमेरिका, यूएई, भारत आणि इंग्लंडमध्ये अल-हुदाच्या शाखा आहेत. एका दहशतवाद्याचे नाव या मदरशाशी जोडले जाण्याची ही पहिलीच घटना असली तरी, या मदरशाचे विचार तालिबानी विचारांशी मेळ खात असल्याची टीका सध्या होत आहे. २९ वर्षीय तश्फीन आणि तिचा पती फारूक यांनी कॅलिफोर्नियामधील हल्ला घडवून आणला होता. तश्फीननेच फारूकला दहशतवादी बनविल्याचा संशय या घटनेच्या शोधकर्त्यांना आहे. मलिक आणि फारूक पोलिसांशी चकमकीत मारले गेले.
दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या तश्फीनने अभ्यासक्रम पूर्ण करण्याआधीच मदरसा सोडल्याची माहिती मदरशातील तिच्या शिक्षकांनी दिली. ती एक चांगली मुलगी होती, तिने मधूनच अभ्यासक्रम का सोडला आणि नंतर तिच्याबरोबर काय झाले याबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचे ते म्हणाले. विद्यापीठातील आपला क्लास पूर्ण केल्यावर तश्फीन मदरशात जात असल्याचे बहाउद्दीन जकारीया विद्यापीठात तिच्याबरोबर शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. २००७ ते २०१२ पर्यंत ती विद्यापीठात शिक्षण घेत होती. तश्फीन ही नियमित विद्यार्थी म्हणून मदरशात येत होती अथवा अशीच आली होती याबाबत माहिती घेत असल्याचे मदरशाची प्रवक्ता फारूख सलीमने सांगितले. अल-हुदा हा पाकिस्तानमधील स्त्रियांसाठीचा प्रसिद्ध मदरसा असून, पाकिस्तानमधील मध्यम आणि उच्चवर्गातील मुलींनाच येथे प्रवेश दिला जातो.