सरकारी ‘पांढरा हत्ती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एअर इंडियाला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. टाटा समूह सरकारी मालकी असलेल्या एअर इंडियाला विकत घेण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. ‘ईटी नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे. टाटा समूहाने एअर इंडिया विकत घेतल्यास या कंपनीला पुन्हा एकदा टाटांचे पाठबळ मिळणार आहे. १९५३ मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयकरण होण्यापूर्वी ही कंपनी टाटा समुहाच्याच मालकीची होती.

टाटा समुहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सरकारसोबत अनौपचारिक चर्चा सुरु केल्याचे वृत्त ‘ईटी नाऊ’ने दिले आहे. एअर इंडियामध्ये टाटा समुहाचे ५१ टक्के शेअर्स असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारलाही एअर इंडियाच्या वास्तवाची जाणीव असून टाटा समुहाने दिलेल्या प्रस्तावावर सरकारही अनुकूल असल्याचे वृत्तात म्हटले आहे.

एअर इंडियाला पांढरा हत्ती म्हणून म्हटले जाते. एअर इंडियावर सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय ४ हजार कोटींचा व्याजाचा बोजादेखील आहे. गेल्या १० वर्षांपासून एअर इंडिया तोट्यात असून अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनीदेखील एअर इंडियाचे खासगीकरण करण्याचे संकेत दिले होते.

भारताच्या एअरलाईन क्षेत्रात एअर इंडियाची घसरण सुरु आहे. गेल्या १० वर्षांत या क्षेत्रातील एअर इंडियाचा वाटा ३५ टक्क्यांवरुन १४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. केंद्र सरकारने एअर इंडियासाठी वेळोवेळी पॅकेज जाहीर केले होते. ३० हजार कोटींचे पॅकेज आत्तापर्यंत जाहीर करण्यात आले असून यातील २४ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत देऊनही एअर इंडियाची घसरण सुरुच आहे.

विशेष म्हणजे एअर इंडिया आणि टाटा समूहाचे संबंध जुने आहेत. १९३२ मध्ये टाटा समुहाचे तत्कालीन प्रमुख जेआरडी टाटा यांच्या प्रयत्नातून भारतात विमान सेवेला सुरुवात झाली. मुंबई ते कराची या मार्गावर पहिले विमान झेपावले होते. स्वातंत्र्यानंतर या कंपनीचे नामकरण एअर इंडिया इंटरनॅशनल असे करण्यात आले. खासगी आणि सरकारी भागीदारीतून ही कंपनी उदयास आली होती. पाच वर्षांनी या एअरलाईन्सची मालकी सरकारकडे गेली.