लैंगिक छळाचे आरोप झाल्याने टाटा मोटर्सने त्यांच्या कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे प्रमुख सुरेश रंगराजन यांची पदावरून हकालपट्टी केली आहे. टाटा मोटर्समधील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप सुरेश रंगराजनवर आहे. त्यामुळे कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले आहे. टाटा मोटर्सने एकदा पार्टी दिली होती. तेव्हा एका महिला कर्मचाऱ्याशी अश्लील वर्तन करत होता. महिलेने ताकीद देऊनही तो थांबला नाही. या मुळे पार्टीत उपस्थित असलेले इतर लोकही खजील झाले. यानंतर सुरेशला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले.

या प्रकरणाची तक्रार महिला कर्मचाऱ्याने केली. त्यानंतर सुरेश रंगराजनला ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. अखेर बुधवारी म्हणजेच १४ नोव्हेंबरला त्याला पदावरून हाकलण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. याआधी त्याने एका महिला कर्मचाऱ्याला अश्लील मेसेज करून त्रास दिल्याचाही प्रकार समोर आला आहे. या महिलेला त्याने त्याच्या नव्या घरी भेटायला बोलावले होते. महिला कर्मचाऱ्याने नकार दिला. मात्र त्यानंतर सुरेश रंगराजन तिला अश्लील संदेश पाठवू लागला. या महिलेने त्याला एवढेही सांगितले होते की माझा बॉयफ्रेंड आहे. त्यावर याने तिला आपल्याबद्दल तू तुझ्या बॉयफ्रेंडला किंवा आई वडिलांना काहीही सांगू नकोस असेही निर्लज्जपणे सांगितले होते.

अशा प्रकारच्या इतरही महिलांचाही सुरेश रंगराजनने छळ केला आहे हे कंपनीने केलेल्या तपासात समोर आले आहे. त्याचमुळे टाटा मोटर्स कंपनीने त्याची पदावरून हकालपट्टी केली आहे.