टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांनी पत्नीशी वादविवाद झाल्यामुळे आत्महत्या केल्याचा निष्कर्ष थायलंडच्या पोलिसांनी काढला आहे. काही ‘कौटुंबिक समस्यां’संबंधी त्यांच्या पत्नीने लिहिलेल्या मुद्दय़ांवरून तिच्यासमवेत त्यांचा वाद झाला आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
स्लिम यांची पत्नी सॅली यांनी आपल्या हस्ताक्षरात तीन पानी लिहिलेले निवेदन वाचल्यानंतर स्लिम यांनी आत्महत्या केली. सदर निवेदनाची प्रत हॉटेलच्या रूमवर पोलिसांना आढळली आहे. या निवेदनात सॅली यांनी कौटुंबिक समस्यांवरून केलेल्या उल्लेखावरून स्लिम यांनी आत्यंतिक टोकाचे पाऊल उचलले असावे, असे पोलिसांनी सांगितले. त्याआधी त्या दोघांमध्ये मोठा वादही झाला होता. मात्र, स्लिम यांनी आत्महत्येपूर्वी स्वत: काही लिहून ठेवले नव्हते. त्यांनी काही तपशीलही दिला नाही, असे पोलीस लेफ्टनण्ट सोमीऑत बूयाकेयू यांनी सांगितले. स्लिम यांची हत्याही झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्लिम हे शांग्रिला हॉटेलच्या २२ व्या मजल्यावर वास्तव्यास होते आणि त्यांनी आपल्या खोलीतील खुल्या खिडकीमधून उडी मारली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.