सर्वसामान्यांना कारचं स्वप्न दाखवणारी टाटा मोटर्सची महत्त्वाकांक्षी नॅनो शेवटचे आचते देत असून कदाचित वर्षभरात तिचं उत्पादन बंद होण्याची शक्यता आहे. एकतर नॅनोच्या प्रकल्पात मोठी गुंतवणूक करावी लागेल किंवा ती बंद करावी लागेल असे दोन पर्याय आहेत आणि आत्तापर्यंतचं अपयश बघता ती बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. टाटा मोटर्सचे व्यवसथापकीय संचालक गुंटर बुशक यांच्याशी बोलताना नवीन सुरक्षेचे निकष लागू झाल्यामुळे नॅनोमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. यामध्ये ती बंद करण्याचा व एकदम नवीन गाडी तयार करण्याचा प्रस्तावही असू शकतो. वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरू असल्याचे गुंटर यांनी सांगितले.

अजून कुठलाही निर्णय घेण्यात आला नसून जर सुरक्षा निकषांमध्ये बसायचं तर नॅनोच्या नूतनीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल असे ते म्हणाले. टाटा मोटर्स सध्या नवीन कार्स व एसयुव्ही लाँच करत आहे. तसेच कंपनीच्या ताफ्यात कुठल्या गाड्या आहेत, कशाची कमतरता आहे आदीबाबत एकूणच सर्वांगी विचार करण्यात येत आहे. नवीन सुरक्षा निकषांमुळे अनेक मॉडेल्सच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीला सुरक्षाविषयक कठोर नियम लागू होणार आहेत आणि सध्याची नॅनो व अनेक गाड्या त्यात बसणार नाहीत अशी स्थिती आहे.

टाटा नॅनो ही 2009 मध्ये झोकात सादर करण्यात आली. तत्कालिन अध्यक्ष रतन टाटा यांच्या कल्पनेतून या गाडीचा जन्म झाला आणि एक लाखाची गाडी अशी तिची ओळख झाली. कालौघात किंमत वाढली पण नॅनो सगळ्यात स्वस्त कारच राहिली. सिंगूर जमीन प्रकरणावरून झालेल्या विलंबानंतर अखेर गुजरातमधल्या साणंद येथून उत्पादन झालेली नॅनो बाजारात मात्र यश मिळवण्यास अपयशी ठरली. नॅनोला वर काढण्याचे कंपनीचे सगळे प्रयत्न फोल झाले असून रतन टाटांची महत्त्वाकांक्षी कार सध्या तरी विपन्नावस्थेत आहे. दिल्लीतल्या ऑटो एक्स्पोमध्ये टाटा मोटर्सने दोन कन्सेप्ट कार्स सादर केल्या आहेत. यामध्ये एका एसयुव्हीचा तर एका हॅचबॅकचा समावेश आहे.