करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ग्रुपने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला विविध उपाययोजनांसाठी ५०० कोटी रुपयांच्या मदतीची शनिवारी घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच टाटा सन्सने अतिरिक्त १००० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे टाटा ग्रुपने एकून १५०० कोटी रुपये करोनाशी लढण्यासाठी दिले आहेत.

यासंदर्भात टाटा सन्सने एक स्टेटमेंटही प्रसिद्ध केलं आहे. यात म्हटलं की, कोविड १९ आजारामुळं सध्याची भारतातील आणि जगाची परिस्थिती ही खूपच वाईट झाली आहे. त्यासाठी आपल्याकडून सर्वात चांगली कृती करण्याची हीच वेळ आहे. नुकतेच, टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांनी या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.

त्यानंतर आता कोविड-१९ या आजाराशी लढण्यासाठी आणि त्यासंबंधी कार्यासाठी टाटा सन्स अतिरिक्त १००० कोटी रुपयांची मदत जाहीर करीत आहे. यासाठी टाटा सन्स आणि टाटा ट्रस्ट आमचे अध्यक्ष रतन टाटा यांच्यासमवेत एकत्र काम करू आणि त्यांच्या पुढाकारांना पूर्ण पाठिंबा देऊ तसेच संपूर्ण हकार्याने कार्य करू.

भारतात आवश्यक व्हेंटिलेटर्सही तयार करणार

टाटा ट्रस्ट्सने स्पष्ट केलेल्या कामांव्यतिरिक्त, आम्ही आवश्यक व्हेंटिलेटर्स देखील आणत आहोत आणि लवकरच भारतातही ते तयार करण्यास तयार आहोत. देशाला अभूतपूर्व परिस्थिती आणि संकटाचा सामना करावा लागत आहे. आपण सेवा देत असलेल्या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आपल्या सर्वांनी जे काही करावे ते करावे लागेल.