News Flash

टाटांनी पुन्हा करुन दाखवलं!; रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात

ट्विट करुन दिली माहिती

संग्रहित

करोनाने पुन्हा एकदा कहर केला असून देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू लागली आहे. रेमडेसिवीर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्रासह अनेक राज्यं केंद्र सरकारकडे मदत मागत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून उपचारासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे. केंद्र सरकारने ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान राज्यं तसंच केंद्र सरकारच्या मदतीने टाटा स्टीलने धाव घेतली आहे.

टाटा स्टीलने ट्विट करत देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता २००-३०० टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती दिला आहे. “करोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना २०० ते ३०० टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्हीदेखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू,” असा विश्वास टाटा स्टीलने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या मदतीला धावले मुकेश अंबानी
जगातील सर्वात मोठी रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेकडून महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. गुजरातमधील जामनगर येथून महाराष्ट्राला हा ऑक्सिजन पुरवठा केला जाणार असून यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याचं कंपनीच्या एका कर्मचाऱ्यानं सांगितलं असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे. कंपनीच्या नियमांमुळे त्यांनी आपलं नाव जाहीर केलेलं नाही.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील ट्विट करत या माहितीला दुजोरा दिला आहे. “रिलायन्सच्या जामनगर प्लँटमधून महाराष्ट्रासाठी १०० मेट्रिक टन अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. विभागीय आयुक्त, रायगड व ठाणे जिल्हाधिकारी आणि एफडीए आयुक्त यांची समन्वय समिती ऑक्सिजन पुरवठ्याबाबत समन्वयाचे काम करेल,” अशी माहिती त्यांनी ट्विटमध्ये दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा करताना बेड्स, व्हेंटिलेटर्ससह ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारकडे महत्वाची मागणी केली. हवाई मार्गाने ऑक्सिजन अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली होती.

यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, “राज्यात दररोज साधारणपणे १२०० मेट्रीक टन ऑक्सिजनचं उत्पादन होतं. आजच्या घडीला आपण १०० टक्के ऑक्सिजनचा वापर हा पूर्णपणे आरोग्य सुविधांसाठी म्हणजे ज्या करोनाबाधितांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे, त्यांच्यासाठी हा प्राणवायू वापरतो. साधारणपणे आज आपण दररोज ९५० ते १००० टन एवढा ऑक्सिजन वापरतो आहोत. बेड्स मिळत नाहीत, ऑक्सिजन अपुरा पडत आहे. रेमडेसिवीरची प्रचंड मागणी वाढलेली आहे. आपण औषध पुरवठा कमी पडू देणार नाही, जिथून मिळतील तिथून औषध घेत आहोत.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 2:59 pm

Web Title: tata steel supplying 200 to 300 tons of liquid medical oxygen daily sgy 87
Next Stories
1 देशात पुन्हा कडक लॉकडाउन लागणार का?; अमित शाह म्हणाले…
2 “कारगिल युद्धापेक्षाही जास्त मृत्यू झालेल्या या युद्धावर लक्ष केंद्रीत केलंय का?”; माजी लष्करप्रमुखांची परखड टीका
3 पश्चिम बंगालमधील सर्व सभा रद्द; राहुल गांधींचा मोठा निर्णय
Just Now!
X