स्मार्टफोन म्हणजे आजकाल सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सोशल मीडियाशिवाय जगणंही कठिण झाल्याचं चित्र आजकाल सर्वत्र पहायला मिळतं. सोशल मीडियावर घालण्यात आलेली बंधण कोणत्या थराला जाऊ शकतात याचं उदाहरण लेबनॉनमध्ये पहायला मिळत आहे. लेबनॉन सरकारने व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक या सोशल मीडिया माध्यमांवर कर लावण्याचा निर्णय घेतला आणि नागरिकांनी याचा विरोध करत संपूर्ण शहरात हिंसक आंदोलन सुरू केलं. गेल्या काही दिवसांपासून लेबनॉनमधील शहरामध्ये हिंसक आंदोलन सुरू आहे.

सरकारच्या या निर्णयानंतर नागरिकांनी फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर लावण्यात आलेला कर मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर यावर विचार करत सरकारनं हा कर मागे घेण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यानंतरही लोकांचा राग मात्र शांत झालेला नाही. कर मागे घेतल्यानंतरही लोकांनी मोठ्या प्रमाणात शहरात जाळपोळ केल्याचं पहायला मिळालं. १७ ऑक्टोबर रोजी सरकारने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडिया माध्यमांवर कर आकारण्याचा निर्णय घेतला होता. या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीला कॉल केल्यास त्यावर कर आकारण्यात येणार होता.

सरकारने फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कॉलसाठी ०.२० डॉलर्सचा कर लावणअयाचा निर्णय घेण्यात आला होता. सरकारच्या या निर्णयानंतर लोकांनी रस्त्यावर उतरत मोठं आंदोलन केलं. त्यानंतर पोलीस आणि नागरिकांमध्ये झालेल्या वादानं हिंसक रूप धारण केल्यानंतर तेथील सरकारने हा निर्णय मागे घेतला. लेबनॉन सध्या बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करत असून त्यातून बाहेर पडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.