टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने आज आपल्या सर्व कर्मचार्‍यांना पगार वाढ जाहीर केली आहे. १ एप्रिलपासून ही पगारवाढ लागू होईल, असे कंपनीने म्हटले आहे.

टीसीएसच्या प्रवक्त्याने मिंट या वृत्तसमूहाला दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, “आम्ही आमच्या सर्व सहयोगींना एप्रिल २०२१ पासून वेतनवाढ देण्याच्या निर्णयाची पुष्टी करतो.”

प्रवक्त्याने पुढे म्हटले आहे की, “या कठीण काळात कंपनीला चालना देण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेणारी आणि अभिनव मानसिकता दर्शविण्याबद्दल आम्ही आमच्या सर्व सहकार्यांचे आभारी आहोत.

आर्थिक वर्ष २०२२ साठी वेतनवाढ जाहीर करणारी टीसीएस ही पहिली आयटी सर्व्हिसेस कंपनी बनली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पगारवाढीची घोषणा केल्यानंतर सहा महिन्यांत दुसर्‍यांदा पगार वाढ करण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आर्थिक वर्ष २०२२ च्या पगाराच्या वाढीसह टीसीएस कर्मचार्‍यांना सहा महिन्यांच्या कालावधीत सुमारे १२ ते १४ % सरासरी वाढ मिळणार आहे.

टीसीएसने ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ७ % वाढ नोंदविली असून ती ₹ ८,७०१ कोटी आहे. कोविड -१९ दरम्यान कंपनीला त्याच्या क्लाउड सर्विसेसच्या मागणीचा जास्त फायदा झाला.