विमानतळावर उशीरा आल्याने विमानात प्रवेश नाकारलेल्या तेलगू देसम पक्षाच्या खासदाराने गुरुवारी विमानतळावर गोंधळ घातला. तेलगू देसमचे खासदार जे सी दिवाकर रेड्डी यांनी एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली असून विशाखापट्टणम विमानतळावर ही घटना घडली. या घटनेच्या वेळी केंद्रीय हवाई नागरी मंत्री अशोक गणपती राजू हेदेखील विमानतळाच्या आवारातच होते.

आंध्रप्रदेशमधील अनंतपूर येथील खासदार दिवाकर रेड्डी हे गुरुवारी विशाखापट्टणम विमानतळावर आले होते. इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाने ते हैदराबादला जाणार होते. नियमानुसार व्हीव्हीआयपी व्यक्ती विमान प्रवास करणार असल्यास त्यांच्या वतीने एखादा कर्मचारी विमानतळावर आधी येऊन बोर्डिंग पास घेतो. पण रेड्डी यांच्यासाठी कोणीही बोर्डिंग पास घेतला नव्हता असे सूत्रांनी सांगितले.
रेड्डी विमानतळावर आले त्यावेळी विमानासाठी चेक इन बंद झाले होते. विमानाच्या टेक-ऑफला अर्धा तासापेक्षा कमी वेळ असताना रेड्डी आले. अशा स्थितीत त्यांना प्रवेश देणे शक्य नव्हते असे सूत्रांचे म्हणणे आहे. विमानात प्रवेश मिळत नाही हे बघून रेड्डी संतापले. त्यांनी विमानतळावरील इंडिगोच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला. त्यांनी फर्निचर आणि प्रिंटरची तोडफोड केल्याचा आरोप आहे. त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्याला धक्काबुक्कीदेखील केली. धक्काबुक्कीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातदेखील कैद झाली आहे.

रेड्डी विमानतळावर गोंधळ घालत असताना तेलगू देसमचे नेते आणि केंद्रीय हवाई नागरी मंत्री अशोक गणपती राजू हेदेखील विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये होते. रेड्डींनी गणपती राजूंना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. पण राजूंनी हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याने रेड्डींचा हिरमोड झाला. या घटनेनंतर रात्री उशीरा इंडिगोने रेड्डी यांना त्यांच्या एअरलाईन्समधून प्रवास करण्यावर बंदी टाकली आहे. दरम्यान, रेड्डी यांनी प्रसारमाध्यमांनी बोलताना धक्काबुक्कीचे वृत्त फेटाळून लावले. मी कोणत्याही कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केलेली नाही असे त्यांनी म्हटले आहे.