तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांना भाजपाने जोरदार झटका दिला आहे. टीडीपीच्या राज्यसभेतील चार खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. चंद्राबाबू नायडूंनी अशी संकटे पक्षासाठी नवीन नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्राबाबू नायडू सध्या सुट्टीवर असून ते युरोपमध्ये आहेत.

अमरावतीमधील पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांनी याबद्दल चर्चा केली असे सूत्रांनी सांगितले. चंद्राबाबू नायडूंनी बंडखोरीच्या कारणांची चौकशी केली व अशी संकटे पक्षाला नवीन नसल्याचे नेत्यांना सांगितले. फक्त आंध्र प्रदेशच्या हितासाठी टीडीपी भाजपाच्या विरोधात लढली असे चंद्राबाबू नायडू म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.

टीडीपीच्या राज्यसभेतील सहा पैकी चार खासदारांनी भाजपामध्ये विलीन करण्यासंदर्भात राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांना पत्र दिले. चार खासदारांच्या प्रवेशामुळे भाजपाचे राज्यसभेतील बळ वाढणार आहे.