उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर येथे राहणाऱ्या सुदीक्षा भाटी हिला अमेरिकेच्या प्रतिष्ठित बॉबसन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली आहे. १२ वी मध्ये सीबीएसई बोर्डातून ९८ टक्के मिळवणाऱ्या सुदीक्षाचा हा प्रवास चांगलाच खडतर राहिलाय. अत्यंत गरीब कुटुंबातून येणाऱ्या सुदीक्षाचे वडील चहा विकून कुटुंबाचा गाडा हाकतात. पण इतकी हलाकीची परिस्थिती असतानाही सुदीक्षाने सर्व परिस्थितीवर मात केली आणि आता अमेरिकेत शिक्षणाचं तिचं स्वप्नही सत्यात उतरणार आहे.

अमेरिकेच्या बॉबसन महाविद्यालयाने सुदीक्षाला ४ वर्षांच्या कोर्ससाठी ३.८ कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. सुरूवातीला शिक्षण पूर्ण करु शकेल की नाही याबाबत शंका होती, शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न मला कठीण वाटत होतं. २०११ मध्ये मला विद्याज्ञान लीडरशीप अकादमी शाळेत प्रवेश मिळाला. त्यामुळे शिक्षण सुरू ठेवणं मला सोपं झालं. या शाळेमध्ये दलित आणि मागासवर्गीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेतात आणि मलाही येथे संधी मिळाली. सुरूवातीला माझ्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी विरोध दर्शवला, मात्र नंतर आई-वडिलांनी मला शिक्षण सुरू ठेवण्याचं प्रोत्साहव दिलं.

अमेरिका जाण्याच्या स्वप्नाबाबत सुदीक्षा म्हणते, माझी आई शिष्यवृत्तीबाबत ऐकून खूपच आनंदित आहे, कारण देवाने तिची प्रार्थना ऐकली असं तिला वाटतंय. माझ्या वडिलांना दुसऱ्या देशात जाऊन शिक्षण घेण्याबाबत थोडी शंका होती. पण आता अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतल्याने मला माझ्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती नसतानाही मी हे स्वप्न पूर्ण करु शकतेय याचा मला सर्वाधिक आनंद झालाय.

विद्याज्ञान लीडरशीप अकादमीची स्थापना २००९ मध्ये शिव नडार यांच्या फाउंडेशनद्वारे करण्यात आली होती. सध्या बुलंदशहर आणि सितापूरचे १९०० पेक्षा जास्त गरीब कुटुंबातील मुलं येथे आपलं शिक्षण घेत आहेत. ‘स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करणं थांबवू नका, सातत्याने मेहनत करत राहावी’ एवढंच मला येथील विद्यार्थ्यांना सांगायचं आहे असं सुदीक्षा म्हणाली.