कोलकाता पोलिसांनी दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्य़ा शिक्षकाला अटक केली आहे. शिक्षकाने विद्यार्थिनीला घटनेबद्दल कोणाला सांगितलं तर गोळ्या घालेन अशी धमकीही दिली होती. गेल्या कित्येक महिन्यांपासून शिक्षक आपलं लैंगिक शोषण करत होता अशी माहिती पीडित विद्यार्थिनीने तक्रारीत दिली आहे.
विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीनुसार, आपल्याला धमकावण्यासाठी आरोपी शिक्षकाने त्याच्याजवळ असणाऱ्या बंदुकीच्या गोळ्या दाखवल्या होत्या. जर कोणाला याबद्दल सांगितलं तर गोळ्या घालून ठार करेन अशी धमकीच त्याने दिली होती. पीडित मुलीच्या पालकांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली.
आरोपीविरोधात दोन वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एक गुन्हा पॉस्को अंतर्गत तर दुसरा बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं असून आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पीडित मुलगी गेल्या दोन वर्षांपासून आरोपी शिक्षकाकडून विज्ञानाचे क्लास घेत होती.
मुलीच्या वागण्यात झालेला बदल पाहून पालकांना शंका आली आणि हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना याप्रकरणी कडक कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला असून लवकरात लवकर चार्जशीट दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 10, 2019 4:39 pm