येथील एका खासगी शाळेत महिला शिक्षिकेने कनिष्ठ शिशुवर्गातील दोन मुलांच्या तोंडाला त्यांनी गप्प बसावे म्हणून सेलोटेप लावला. या शिक्षिकेला तातडीने निलंबित करण्यात आल्याची माहिती शाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली असून ही घटना ऑक्टोबरमध्ये झाली होती.

या चित्रफितीत शिक्षिका या दोन मुलांच्या तोंडाला सेलोटेप लावताना दिसत आहे. यात एक चार वर्षांचा मुलगा व चार वर्षांची मुलगी यांचा समावेश आहे. दोन विद्यार्थ्यांच्या आईवडिलांनी शाळेच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली असून शिक्षिकेस निलंबित करण्यात आले आहे. शाळेचे प्राचार्य गुरूराज यांनी सांगितले,की आईवडिलांच्या तक्रारीनंतर आम्ही सदर शिक्षिकेवर कारवाई केली आहे. महिला शिक्षिकेने असे म्हटले आहे,की ही दोन मुले वर्गात बडबड करीत असल्याने इतरांना त्रास होत होता तसेच ती घाणेरडी भाषा वापरत होते.