करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आलं आहे. परंतु गरीब विद्यार्थ्यांना मोबाइल परवडत नसल्यानं आणि त्यांची शिक्षणाची गाडी थांबू नये यासाठी तामिळनाडूतील मदुराई येथील शिक्षकांनी आपल्याच वेतनातून विद्यार्थ्यांसाठी मोबाइल विकत घेऊन दिले.

देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या लॉकडाउनमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी अनेक राज्यांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. परंतु गरीब विद्यार्थ्यांसमोर यासाठी लागणारा मोबाइल आणि इंटरनेटची व्यवस्था कशी करावी हा प्रश्न उभा ठाकला आहे. दरम्यान, तामिळनाडूतील मदुराई येथील सरकारी शाळेतील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.

मदुराईमध्ये असलेल्या थियागराज सरकारी शाळेतील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला मिळणाऱ्या वेतनातून मोबाइल फोन उपलब्ध करून दिले आहेत. कोणत्याही प्रकारच्या अडचणींशिवाय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता यावं यासाठी हे पाऊल उचलल्याचं शिक्षकांकडून सांगण्यात आलं.