News Flash

क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी घडवावेत

राष्ट्रपतींचे शिक्षक दिनानिमित्त आवाहन, करोना काळातील सेवेचा गौरव

| September 6, 2021 12:33 am

क्षमता लक्षात घेऊन विद्यार्थी घडवावेत

राष्ट्रपतींचे शिक्षक दिनानिमित्त आवाहन, करोना काळातील सेवेचा गौरव

नवी दिल्ली : मुलांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचे काम कौतुकास्पद आहे, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्षकांच्या कामाचा शिक्षक दिनानिमित्त  गौरव केला. कोविड साथीत कमी काळात शिक्षकांनी डिजिटल माध्यमांचे शिक्षण घेऊन मुलांचे शिक्षण थांबू दिले नाही, असेही ते म्हणाले.

देशातील ४४ शिक्षकांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ आभासी पद्धतीने प्रदान करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात अभिनव पद्धती विकसित करण्याच्या योगदानासाठी त्यांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत.

प्रत्येक मुलाची क्षमता व बुद्धिमत्ता वेगळी असते, असे सांगून राष्ट्रपती म्हणाले, की  शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या विविध गरजा व हित  लक्षात घेऊन त्यांचा सर्वागीण विकास करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक मुलाची  क्षमता , सामाजिक पार्श्वभूमी तसेच आजूबाजूची परिस्थिती वेगळी असते ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या विविध क्षमतांचा उपयोग करून घेत शिक्षकांनी त्यांच्याकडे  लक्ष द्यावे,असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांमध्ये काही उपजत क्षमता असतात, त्यांचा वापर शिक्षकांनी करून घेऊन त्यांना त्यात काम करण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे. कुठलाही चांगला शिक्षक हा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व त्याच बरोबर समाज व देश घडवणारा असतो,अशा शब्दांत शिक्षकांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

राष्ट्रपती कोविंद यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले असून ते म्हणाले, की  विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांना घडवणारे शिक्षक असतील तर पुढील पिढी ही शिक्षकांच्या हातात सुरक्षित आहे असा आपल्याला विश्वास वाटतो. शिक्षकांचे प्रत्येकाच्या जीवनातील स्थान वेगळे असते. कारण शिक्षकच विद्यार्थ्यांना प्रेम लावून त्यांच्यातील गुण विकसित करत असतात, त्यांच्यासाठी परिश्रम घेत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना नेहमीच आदर प्राप्त होतो.

कोविंद म्हणाले, की सध्या शिक्षकांना डिजिटल मंचाचे शिक्षण अत्यंत अल्प कालावधीत आत्मसात करून शैक्षणिक प्रक्रिया चालू ठेवावी लागली. काही शिक्षकांनी शाळांमध्ये लक्षणीय असे पायाभूत प्रकल्प विकसित केले असून ते त्यांच्या परिश्रमाची व समर्पणाची साक्ष देतात. अशा समर्पित शिक्षकांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

‘ज्ञानाच्या क्षेत्रात देश जागतिक महाशक्ती व्हावा’

गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाबाबत त्यांनी सांगितले, की या धोरणामध्ये महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट असून भारताला ज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक महाशक्ती बनवण्याचा उद्देश आहे. घटनात्मक मूल्यांचे पालन करण्याबाबत मुलांमध्ये वचनबद्धता वाढवणारे शिक्षण महत्त्वाचे असून त्यात त्यांना मूलभूत हक्क व कर्तव्यांची जाणीव करून दिली पाहिजे, त्याचबरोबर त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढीस लागली पाहिजे. जगातील बदलती परिस्थिती त्यांना समजली पाहिजे,  हे उद्देश नवीन शिक्षण धोरणात साध्य करण्यात येत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2021 12:33 am

Web Title: teachers day 2021 president ram nath kovind awards 44 teachers on teachers zws 70
Next Stories
1 छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांविरोधात गुन्हा
2 अमेरिकेतील पुरात भारतीय वंशाच्या तिघांचा मृत्यू
3 केरळमध्ये निपाहमुळे मृत्यू; केंद्रीय पथके तातडीने रवाना
Just Now!
X