अध्यापन हा काही निव्वळ व्यवसाय नाही, तर तो एक जीवनधर्मच आहे, असे सांगत नव्या पिढीला घडविण्यासाठी शिक्षकांनी जगात घडत असलेले बदल समजावून घ्यावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केले.
शुक्रवारच्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून देशभरातील ३५० शिक्षकांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला या शिक्षकांशी संवाद साधताना मोदी यांनी आपली मते मांडली. शिक्षक हा कधीही निवृत्त होत नसतो, नव्या पिढीला घडविण्यासाठी शिक्षक कायम कार्यरत असतो, असे त्यांनी नमूद केले.
 गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी आरूढ झाल्यानंतर आपल्या मनात दोन इच्छा होत्या. एक म्हणजे, आपल्या बालपणीच्या मित्रांना भेटणे आणि दुसरी म्हणजे आपल्या शिक्षकांचा सन्मान करणे. या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्याचे सांगत कोणत्याही विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षकाची भूमिका महत्त्वपूर्ण असते, याकडे पंतप्रधान मोदी यांनी लक्ष वेधले.