भारतातील नोटाबंदी ही दीर्घकाळासाठी लाभदायक ठरेल असे अॅपलचे सीईओ टीम कूक यांनी म्हटले. नोटाबंदीचा निर्णय हा धाडसी होता आणि पुढील काळात या नोटाबंदीचे लाभ दिसू शकतील असे टीम कूक यांनी म्हटले. तिमाही संपल्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त केले. भारतामध्ये नोटाबंदी होती तरी देखील अॅपलच्या उत्पादनांची विक्रमी विक्री झाल्याचे कूक यांनी म्हटले. भारतामध्ये नोटाबंदीनंतर चलनतुटवडा निर्माण झाला होता. तरी देखील अॅपलच्या विक्रीवर काही प्रभाव पडला नसल्याचे त्यांनी नमूद केले.

नोटाबंदीनंतर लोकांना अनेक तासांसाठी बॅंकांमध्ये आणि एटीएमच्या रांगेत उभे राहावे लागत असे. ही परिस्थिती निवळली जरी असली तरी नोटाबंदीचा प्रभाव अद्यापही भारतावर दिसत असल्याचेही ते म्हणाले. अनेक रेटिंग एजन्सीज, आयएमएफने नोटाबंदी ही भविष्यासाठी फायदेशीर ठरेल असे म्हटले होते. त्याचा संदर्भ घेऊन कूक म्हणाले की नोटाबंदी ही दीर्घकाळाचा विचार केला असता फायदेशीर ठरेल. भारतामध्ये अॅपलची झपाट्याने वाढ होत आहे. भारतामध्ये उत्पादन सुरू करण्याबाबतही आमची चर्चा सुरू आहे असे ते म्हणाले. तसेच त्याबरोबर भारतातील अॅपल रिटेल स्टोअरबाबतही बोलणी सुरू आहेत असे ते म्हणाले. भारतीय बाजारपेठ ही सर्वोत्तम बाजारपेठ असल्याचे ते म्हणाले. अमेरिका, जपान, कॅनडा, फ्रांस, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, भारत, तुर्की आणि रशिया या देशांमध्ये अॅपलची दोन आकडी वाढ झाली आहे. अॅपलने या तिमाहीमध्ये १ कोटी ३१ लाख उत्पादने विकली असे अॅपलचे मुख्य अर्थ अधिकारी लुका मेस्त्री यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यानंतर ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी घालण्यात आली. ५०० आणि १००० च्या नोटांच्या ऐवजी २००० आणि ५०० च्या नव्या नोटा बाजारात आणल्या गेल्या. जुन्या नोटांची चलनातील किंमत १४ लाख कोटी रुपये इतकी होती. जवळपास ८६ टक्के रोख रक्कम बिनकामाची झाल्यामुळे देशात चलनकल्लोळ निर्माण झाला होता. मला केवळ ५० दिवस द्या मी सर्व काही ठीक करतो अशी विंती पंतप्रधान मोदींनी जनतेला केली होती. त्यानंतर परस्थिती हळुहळु निवळायला लागली आहे. पंतप्रधान मोदींनी त्यानंतर रोख रहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. भ्रष्टाचार आण दहशतवाद रोखण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय आपण घेतला होता असे पंतप्रधान म्हणाले होते.