विमाननिर्मिती उद्योगातील अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी बोइंगच्या अभियंत्यांचे पथक एअर इंडियाच्या मालकीच्या ६ ‘ड्रीमलाइनर’ विमानांमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी मुंबईत येणार आहे. ‘ड्रीमलाइनर’च्या बॅटरीने पेट घेतल्याच्या जानेवारीमधील दुर्घटनेनंतर या विमानाची उड्डाणे थांबविण्यात आली होती.
येत्या १० मेपासून ६ पैकी किमान २ विमानांचे उड्डाण पुन्हा नव्याने सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे सध्या उड्डाण स्थगित करण्यात आलेल्या बोइंग-७८७ या विमानातील बॅटरीमध्ये दुरुस्त्या करण्यासाठी ३० अभियंत्यांचे एक पथक मुंबईत दाखल होणार आहे. मेअखेपर्यंत सर्वच्या सर्व विमानांचे पुन्हा उड्डाण सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्या दृष्टीने ते अभियंते प्रयत्न करतील, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.
बॅटरीमधील समस्यांवर उपाय शोधून येत्या ५ मेपर्यंत पहिले विमान उड्डाणासाठी सज्ज करण्यात येईल, तर ९ मेपर्यंत दुसरे विमानही उड्डाणासाठी तयार होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनतर्फे नव्या बॅटरी संचाला हिरवा कंदील दाखविण्यात आला होता, त्याला अनुसरून बोइंग विमानात दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.