समाजवादी पक्ष(सप) नेत्याच्या अंगरक्षकाने अश्लील हावभाव आणि छेडछाड केल्याने भररस्त्यात एका रणरागिणीचे रुप आग्राच्या रस्त्यावर पाहायला मिळाले. भररस्त्यात आपली छेडछाड केल्याच्या आरोपावरून साध्वी पांडे या तरुणीने सप नेत्याच्या मर्सिडीजची तोडफोड केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साध्वी पांडे ही तरुणी आपल्या बहिणीसोबत दुचाकीने डॉक्टरकडे जात असताना हा किस्सा घडला. दुचाकीच्या बाजूने जाणाऱया सप नेत्याच्या मर्सिडीज कार मधील अंगरक्षकाने आपल्याला उद्देशून अश्लील हावभाव केल्याने साध्वी पांडे या तरुणीला राग अनावर झाला. त्या मर्सिडीजमधील अंगरक्षकाचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये टीपण्याचा प्रयत्न तरुणीने केल्यानंतर अंगरक्षकाने मोबाईल हिसकावून तो फोडून टाकला. या प्रकारामुळे राग अनावर झालेल्या साध्वी पांडे हिने भररस्त्यात मर्सिडीजवर चढून तोडफोड केली आणि अंगरक्षकाला धडा शिकवला.