शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टर रूग्णाच्या शरीरामध्ये एखादी गोष्ट विसरल्याच्या बातम्या आपण अनेकदा वाचतो. मात्र हरियाणामधील पंचकुलामध्ये डॉक्टर एका रूग्णालाच एमआरआय मशीनमध्ये विसरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेक्टर सहामधील रूग्णालयामधील सिटी स्कॅन सेंटरमध्ये ६१ वर्षीय राम मेहर हे एमआरआय चाचणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना एमआरआय मशीनमध्ये टाकले आणि ते मेहर यांना तिथेच विसरले. श्वास कोंडल्यानंतर मेहर यांनी धडपड करण्यास सुरुवात केली. मात्र त्यांना बेल्टने बांधले असल्याने उठता येत नव्हते. अखेर बराच वेळ धडपड केल्यानंतर मशीनचा बेल्ट तुटला आणि मेहर धापा टाकत मशीनमधून बाहेर पडले.

मेहर यांनी या प्रकरणामध्ये एमआरआय आणि सिटी स्कॅन सेंटरच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी थेट हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांच्याकडे यासंदर्भातील तक्रार केली आहे. ‘त्या मशीनमधून बाहेर येण्यास मला ३० सेकंदांचा उशीर झाला असता तरी माझा मृत्यू झाला असता,’ असं मेहर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

स्कॅनिंग सेंटरचे स्पष्टीकरण

या प्रकरणाबद्दल स्कॅनिंग सेंटरची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यमांनी केला असता, ‘यामध्ये सेंटरमधील कर्मचाऱ्यांची काहीच चूक नाही’ असं सेंटरच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कर्मचाऱ्यांनीच या व्यक्तीला मशीनमधून सुखरुप बाहेर काढल्याचा दावा सेंटरमधील अधिकाऱ्यांनी केला आहे. एकूण २० मिनिटांसाठी या रूग्णाला मशीनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी शेवटच्या तीन मिनिटांमध्ये कर्मचारी सर्व आकड्यांची नोंदणी करणार होते. मात्र दोन मिनीट बाकी असतानाच या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढल्याचं स्कॅनिंग सेंटरने म्हटलं आहे.

मशीनमध्ये असताना हलचाल करुन नका अशी ताकीद मेहर यांना कर्मचाऱ्यांनी दिली होती. मेहर यांना मशीनमध्ये ठेऊन कर्मचारी शेजारच्या मशीनमधील आकडे घेण्यासाठी गेला. तो कर्मचारी परत आला तेव्हा मेहर स्वत:च धडपडत मशीनच्या बाहेर येताना त्याला दिसले. त्याने लगेच मेहर यांना बाहेर काढण्यास मदत केली असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.