05 July 2020

News Flash

जम्मू बसस्थानकात बॉम्बहल्ला ;१ ठार, ३२ जखमी; हल्लेखोर अटकेत

जम्मू बस स्थानकावर दहशतवाद्यांनी केलेला गेल्या दहा महिन्यांतला हा तिसरा हल्ला आहे.

जम्मू : भारत-पाकिस्तानातील तणावाच्या पाश्र्वभूमीवर जम्मूच्या मध्यवर्ती भागांतील अत्यंत गजबजलेल्या बस स्थानकावर गुरुवारी झालेल्या बॉम्बहल्ल्यात एक युवक मरण पावला, तर किमान ३२ जण जखमी झाले आहेत. संशयित हल्लेखोर यासिर भट याला अटक झाली असून तो हिजबुल मुजाहिदीनचा हस्तक आहे.

जम्मू बस स्थानकावर दहशतवाद्यांनी केलेला गेल्या दहा महिन्यांतला हा तिसरा हल्ला आहे. या हल्ल्यात उत्तराखंडमधील हरिद्वारचा रहिवासी असलेल्या महम्मद शरिक या १७ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू ओढवला. त्याच्या छातीत लोखंडी तुकडे घुसले होते.

जखमींपैकी पाचजणांची प्रकृती चिंताजनक असून त्यात एका बसचालकाचा आणि वाहकाचाही समावेश आहे. जखमींमध्ये काश्मीरच्या ११, बिहारच्या दोन, छत्तीसगड आणि हरयाणातील प्रत्येकी एका नागरिकाचा समावेश आहे.

यासंदर्भात जम्मूचे पोलीस महानिरीक्षक मनीष सिन्हा यांनी सांगितले की, कुलगाम येथे राहाणारा हिजबुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर फारूक अहमद भट ऊर्फ ओमर याच्याकडून यासिरला स्फोटके मिळाली होती.

यासिर हा गुरुवारी सकाळीच जम्मूत पोहोचला होता. हल्ल्यानंतर फरारी झालेल्या यासिरला नागरोटा येथील टोलनाक्यावर अटक करण्यात आली. प्रत्यक्ष साक्षीदारांचा जबाब आणि सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे त्याला तातडीने अटक झाली असून त्याने या कृत्याची कबुली दिली आहे.

बॉम्बहल्ल्यात स्थानकात उभ्या असलेल्या एका बसचे अतोनात नुकसान झाले आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. ही बस बहुतांश रिकामीच होती. मात्र स्फोटाने मोठी घबराट पसरली.

फुटीरतावादी नेत्यांकडून निषेध

नि:शस्त्र नागरिकांवरील हल्ला हा निंदनीय असून या हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले तसेच जे जखमी झाले त्यांच्या आप्तांच्या शोकात आम्ही सहभागी आहोत, असे पत्रक फुटीर नेत्यांच्या ‘संयुक्त प्रतिकार समिती’ (जेआरएल)ने काढले आहे. या समितीत सईद अली शाह गिलानी, मिरवैज़्‍ा उमर फारूक आणि यासिन मलिक आदी नेते सामील आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2019 5:14 am

Web Title: teen killed over 30 injured in grenade attack at jammu bus stand
Next Stories
1 सोनिया गांधीही मैदानात!
2 पुरुषांच्या तुलनेत महिलांना १९ टक्के कमी वेतनमान
3 लोकपाल समितीच्या बैठकीची माहिती द्या
Just Now!
X