अ‍ॅपल या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या अमेरिकन कंपनीमध्ये काम करण्यास उत्सुक असलेल्या ऑस्ट्रेलियातील एका शाळकरी मुलाने अ‍ॅपलच्या संगणक यंत्रणेमध्ये हॅकिंगद्वारे घुसखोरी केल्याची घटना समोर आली आहे. मात्र यामध्ये ग्राहकांच्या माहितीला कोणत्याही प्रकारे धक्का लागलेला नाही, ती सुरक्षित आहे, अशी ग्वाही कंपनीने दिली आहे.

सदर हॅकर केवळ १६ वर्षांचा असून त्याच्याविरुद्ध व्हिक्टोरिया येथील बालन्यायालयात खटला सुरू आहे. मेलबर्नच्या उपनगरात राहणाऱ्या या मुलाने घरातूनच अ‍ॅपलच्या मेनफ्रेम या डेटा प्रोसेसिंग यंत्रणेमध्ये घुसखोरी केली आणि सुरक्षित फायलींमधील ९० जीबी डेटा डाऊनलोड केला, असे न्यायालयात सांगण्यात आले. सदर प्रकरण उघडकीस आल्यानंतर एफबीआय आणि ऑस्ट्रेलियातील पोलिसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर तपासाला सुरुवात केली आहे.

अ‍ॅपलचा चाहता असलेल्या या मुलाचे सदर कंपनीमध्ये काम करण्याचे स्वप्न होते, त्यामुळे त्याने वर्षभरात अनेकदा यंत्रणेमध्ये घुसखोरी केली. पोलिसांनी या मुलाच्या घरी छापा टाकून गेल्या वर्षी हॅकिंगविषयीच्या सूचना आणि फायली हस्तगत केल्या होत्या. सदर मुलाने आपला गुन्हा कबूल केला असून पुढील महिन्यात त्याला शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.

माहिती उघड झाल्यानंतर अ‍ॅपलने एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यामध्ये ग्राहकांच्या वैयक्तिक माहितीला धक्का लागलेला नाही, असे स्पष्ट केले आहे.