‘तहलका’च्या व्यवस्थापकीय संपादिका शोमा चौधरी यांनी ‘तरुण तेजपाल लैंगिक अत्याचार’ प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सातत्याने केला जात होता. अखेर शोमा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शोमा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे या प्रकरणास आता आणखी वळण लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
गुरुवारी सकाळी त्यांनी आपला राजीनामा पाठवून दिला. तरुण तेजपाल पोलिसांच्या कचाटय़ातून वाचण्याची शक्यता नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर हा राजीनामा देण्यात आला. याप्रकरणी गोवा पोलिसांच्या प्राथमिक माहिती अहवालात शोमा यांचेही नाव असण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यामुळेच चौधरी यांनी राजीनामा दिला असावा, असे सांगण्यात येते. ‘ तेजपाल यांना वाचविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, आपल्या स्त्रीवादी भूमिकांपासून आपण पळ काढीत आहोत, असे आरोप गेला आठवडाभर आपल्यावर केले जात होते. काही बाबी मी निश्चितच थोडय़ा भिन्न पद्धतीने हाताळू शकले असते, हे खरे आहे. मात्र तेजपालला वाचविण्याचा मी प्रयत्न केलेला नाही. मात्र एकूणच माझे पत्रकार मित्र, सहकारी आणि समाज यांनी आपल्या बांधीलकीबाबतच संशय घेतला आहे. माझ्यामुळे तहलकाची प्रतिमा डागाळली जाऊ नये, अशी इच्छा असल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे’, असे शोमा यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2013 12:28 pm