समाज माध्यमांवर व्हिडिओच्या माध्यमातून निकृष्ट अन्नाची तक्रार करणारे जवान तेज बहादूर यादव गायब झाल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तेज बहादूर यादव यादव यांच्या पत्नीने याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली आहे. तेज बहादूर यादव नेमके कुठे आहेत, याबद्दलची कोणतीही माहिती देण्यात येत नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे.

एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर २४ तासांमध्ये त्याला न्यायालयासमोर हजर करणे आवश्यक असते. न्यायालयाकडून संबंधित व्यक्तीला कोठडी सुनावली जाते. मात्र तेज बहादूर यांना न्यायालयासमोर हजर न करता त्यांना अनेक दिवसांपासून ताब्यात ठेवण्यात आल्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. यासोबत सीमा सुरक्षा दलाकडून तेज बहादूर यादव यांची माहिती दिली जात नसल्याचेही तेज बहादूर यादव यांच्या कुटुबियांनी सांगितले आहे.

‘कुटुंबीय तेज बहाजूर यादव यांना संपर्क साधायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सीमा सुरक्षा दलाला दोन पत्रेदेखील पाठवण्यात आली. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही,’ अशी माहिती तेज बहादूर यादव यांच्या पत्नीचे भाऊ विजय यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना दिली आहे. ‘यादव यांनी पत्नीसोबतच्या अखेरच्या संभाषणात सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी त्यांना अज्ञात स्थळी घेऊन जात असल्याची माहिती दिली होती. मात्र यापेक्षा अधिक ते काहीच बोलू शकले नाहीत. आम्ही डीआयजी यांना दोन पत्र लिहिली. मात्र त्यांच्याकडून कोणतेच उत्तर मिळाले नाही,’ अशी माहिती विजय यांनी दिली आहे.

तेज बहादूर यादव यांचा व्हिआरएस अर्ज रद्द करण्याबद्दल बोलताना विजय यांनी संताप व्यक्त केला. ‘जर तेज बहादूर यादव दुसऱ्या देशाचे रहिवासी असते, तर त्यांचा व्हिआरएस रद्द करता आला असता. त्यांची चौकशीदेखील करता आली असती. त्यांना व्हिआरएस देऊन त्यांच्या चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत होते. आम्ही अत्यंत त्रस्त आहोत,’ असे विजय यांनी सांगितले.