सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना पुरवले जाणारे अन्न चांगल्या दर्जाचे असून कोणीही याबद्दलची पडताळणी करावी, असे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) प्रमुख के. के. शर्मा यांनी म्हटले आहे. बीएसएफचे निलंबित जवान तेजबहादूर यादव यांनी जानेवारी महिन्यात जवानांना मिळणाऱ्या अन्नपदार्थाच्या सुमार दर्जाबद्दल भाष्य करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. यावर बोलताना के. के. शर्मा यांनी पाकिस्तानच्या आयएसआयने संबंधित व्हिडिओचा चुकीचा वापर केल्याचे म्हटले. बीएसएफच्या जवानांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी आयएसआयने त्या व्हिडिओचा वापर केला, असेदेखील त्यांनी म्हटले.

‘मी २००२ मध्ये बीएसएफमध्ये अतिरिक्त महासंचालक म्हणून रूजू झालो. मात्र तेव्हापासून एकाही जवानाने अन्नपदार्थाच्या दर्जाबद्दल तक्रार केलेली नाही. बदली किंवा पोस्टिंग यांच्याबद्दल काही समस्या असू शकतात. त्यामुळेच जेव्हा तेज बहादूर यादव यांनी अन्नपदार्थांच्या दर्जाबद्दल तक्रार करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला, तेव्हा मला धक्का बसला,’ असे बीएसएफ प्रमुख शर्मा यांनी म्हटले. ‘बीएसएफच्या जवानांना अतिशय सकस आकार दिला जातो. याशिवाय खाद्यपदार्थांचा दर्जा नियमित तपासला जातो. त्यामुळे जेवणाबद्दल अद्याप कोणीही तक्रार केलेली नाही,’ असे शर्मा यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

कोणीही कधीही सीमेवरील आमच्या कोणत्याही चौकीवर जाऊन बीसीएफ जवानांना मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा तपासावा, असे खुले आव्हानदेखील शर्मा यांनी दिले. ‘तुम्ही कधीही कोणत्याही चौकीवर गेलात, तरीही जवानांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळत असल्याचे तुम्हाला दिसेल. बीएसएफच्या जवानांना सकस आहार पुरेशा प्रमाणात दिला जातो,’ असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले. सीमा सुरक्षा दलात २.६५ लाख जवान आहेत.

तेजबहादूर यादव यांनी बीसीएफ जवानांना मिळणाऱ्या अन्नाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. सीमेवरील जवानांना अतिशय निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याचे यामध्ये त्यांनी म्हटले होते. यानंतर यादव यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले. तेजबहादूर यादव यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओचा आयएसआयकडून गैरवापर करण्यात आल्याचे बीएसएफच्या प्रमुखांनी म्हटले.