करोनाशी लढा सुरू असतानाच देशावर आर्थिक संकट ओढवलं आहे. देशाचा जीडीपी चार दशकांमध्ये पहिल्यांच प्रचंड घसरला आहे. जीडीपीच्या आकड्यांबद्दल सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून २३.९ टक्क्यांनी आक्रसल्याचे, सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीने स्पष्ट झालं. तिमाहीगणिक आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या १९९६ पासून सुरू झालेल्या प्रघातापासून, नकारात्मक आर्थिक विकासाची ही सर्वात भयाण आकडेवारी असून, एकूणच आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सर्वात वाईट कामगिरीही असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झालं आहे. याचवरुन आता विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राष्ट्रीय जनता दलचे नेते तेज प्रताप यादव यांनाही मोदी सरकारवर निशाणा साधत, “मोदींनी मुद्दाम भारताला आर्थिक संकटात ढकललं आहे,” अशी टीका केली आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आर्थिक विकास दर एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली गेला आहे यासंदर्भातील लेख शेअर करत तेज प्रताप यांनी आक्रसलेल्या जीडीपीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “या आर्थिक संकटाचे मुख्य कारण करोना नसून मोदी सरकारची अयशस्वी ठरलेली धोरणं आहेत. आपली अर्थव्यवस्था (करोना) साथीच्या आधीच गडबडली होती. त्यावेळी मोदी सरकारने हे मान्य केलं नाही आणि त्यासंदर्भात कोणत्याही ठोस उपाययोजनाही केल्या नाहीत. मुद्दाम देशाला या संकटात ढकललं आहे,” असं तेज प्रताप यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.
राहुल गांधी म्हणतात, ‘ही तर मोदी निर्मित संकटे’
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही आर्थिक संकटाच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. “भारत मोदी मेड डिझास्टरखाली दाबला गेला आहे,” या शिर्षकाखाली राहुल गांधी यांनी देशासमोरील सहा वेगवेगळ्या समस्यांची यादी ट्विट केली आहे. यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा उणे २३.९ टक्क्यांनी आक्रसलेला जीडीपीचा दर, दुसरा मुद्दा ४५ वर्षांमधील सर्वाधिक बेरोजगारीचा दर, तिसरा मुद्दा १२ कोटी लोकांचा रोजगार बुडणे, चौथा मुद्दा केंद्र सरकारने राज्यांना जीएसटीची रक्कम न देणे, पाचवा मुद्दा करोनाबाधितांच्या आकड्यात आणि मृत्यूमध्ये दैनंदिन पातळीवर सर्वात मोठी जागतिक वाढ भारतात असणे आणि सहावा मुद्दा भारताच्या सीमावर शेजारच्या देशांनी कुरघोड्या करण्याचा असल्याचे म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 2, 2020 12:58 pm