पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मुलाची लालूप्रसाद यादव यांनी कानउघडणी केली. माझ्या सुरक्षेबाबत मुलाला चिंता वाटणे साहजिक आहे, मात्र पंतप्रधानपदावरील व्यक्तीसाठी पुन्हा असे विधान करु नको, असे त्यांनी मुलाला सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत तेजप्रताप यादव यांनी आक्षेपार्ह विधान केल्याने वाद निर्माण झाला आहे. लालूप्रसाद यादव यांच्या सुरक्षेत कपात केल्याने राष्ट्रीय जनता दलातील नेते संतापले आहेत. यावरुन टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींची चामडीच सोलून काढू, असे बेताल विधान तेजप्रताप यादव यांनी केले होते. तेजप्रताप यादव हे बिहारचे माजी आरोग्यमंत्री आहेत. लालूजींचा खून करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. तेजप्रताप यादव यांनी पंतप्रधानांविषयी बेताल विधान केल्याने सर्वच स्तरातून टीका होत होती.

अखेर लालूप्रसाद यादव यांनी सोमवारी दुपारी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. लालूप्रसाद यादव म्हणाले, तेजप्रताप यादव माझा मुलगा आहे. पित्याविरोधात षडयंत्र रचल्यास आणि पित्याच्या सुरक्षेत कपात केल्यास त्याला चिंता वाटणे साहजिक आहे. मात्र मी त्याच्या विधानाशी सहमत नाही. पुन्हा असे विधान करु नको असे मी त्याला सांगितल्याचे लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

मी कुठे जावे, असे मोदींना वाटत नाही. माझ्यावर हल्ला करण्याचा त्यांचा कट आहे. मी रेल्वेमंत्री असताना गुजरातमध्ये गेलो होते, त्यावेळी मोदी मुख्यमंत्री होते, त्यावेळी देखील माझ्या कारवर दगडफेक झाली होती, अशी आठवण त्यांनी सांगितली. मी कोणालाही घाबरत नाही, तुम्ही दुसऱ्यांना घाबरवू शकता, जसे तुम्ही नितीशकुमारांना घाबरवले होते. बिहारमधील ११ कोटी जनता आणि प्रत्येक लहान मुलगा माझे रक्षक आहेत, असे त्यांनी  मोदींना सुनावले.