स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला बळकटी देणारी एक चांगली बातमी आहे. पुढच्या काही काळात इंडियन एअर फोर्समध्ये १२३ ‘तेजस’ फायटर विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यातील ५१ टक्के ‘तेजस’मध्ये स्वदेशी बनावटीची ‘उत्तम’ रडार यंत्रणा असेल. आधी निर्मिती करण्यात आलेल्या काही ‘तेजस’मधील इस्रायली रडारच्या जागी, ही ‘उत्तम’ रडार यंत्रणा बसवण्यात येईल.
इंडियन एअर फोर्सला १२३ ‘तेजस’ फायटर जेट मिळणार आहे. त्यात ४० विमाने फायनल ऑपरेशनल क्लियरन्समध्ये आहेत. ८३ तेजस मार्क-१ए साठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात ऑर्डर देण्यात आली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानांचे उत्पादन करत आहे. पहिल्या ४० तेजसमध्ये इस्रायली बनावटीचे रडार आहेत तर, ८३ तेजस मार्क-१ए AESA रडार यंत्रणा असेल.
“तेजस मार्क-१ए मध्ये उत्तम रडार यंत्रणा असेल. आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये उत्तमने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. HAL बरोबर आम्ही सामंजस्य करार केला आहे” असे डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी सांगतिले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. ८३ पैकी ६३ तेजस विमानात उत्तम रडार यंत्रणा असेल.
डीआरडीओच्या बंगळुरुमधील LRDE प्रयोगशाळेने हे रडार विकसित केलेय. मोदी सरकार संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीवर भर देत आहे. उत्तम रडारमुळे तेजसमध्ये स्वदेशी घटकांचे प्रमाण वाढणार आहे. तेजसच्या निर्मितीमध्ये ६२ ते ६५ टक्के स्वदेशी घटक वापरण्याचा HAL चा प्रयत्न आहे. उत्तम रडारमुळे HAL ला त्यांच्या उद्दिष्टात मदत होणार आहे. उत्तम रडारमध्ये एकाचवेळी वेगवेगळया लक्ष्यांना शोधण्याची तसेच उच्चप्रतीचे फोटो काढण्याची क्षमता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 22, 2021 3:42 pm