राम मंदिराचा मुद्दा देशभरात गाजतो आहे, राम मंदिर होणार की नाही? हा प्रश्न आता सगळेच विचारू लागले आहेत. अशात आता राजदचे नेते तेजस्वी यादव यांनीही भाजपावर निशाणा साधला आहे. अखिलेश यादव म्हटले, ”स्वर्गात प्रभू रामचंद्र आणि सीतामाई बोलत असतात. तेवढ्यात प्रभू रामचंद्रांना उचकी लागते. सीतामाई विचारते की रामराया काय झाले? तुम्हाला उचकी का लागली? प्रभू रामचंद्र म्हणतात अगं निवडणुका जवळ आल्या आहेत भाजपाने आठवण काढली, त्यामुळे उचकी लागली.” असं म्हणत राम मंदिराच्या प्रश्नावर त्यांनी भाजपावर टीका केली आहे.

राम मंदिर कधी होणार हे भाजपाने सांगितलेले नाही फक्त निवडणुका आल्या की भाजपाला प्रभू रामचंद्रांची आठवण येते असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. इतकंच नाही तर या देशात कुणालाही व्यक्त होण्याचा अधिकार उरलेला नाही. जी माणसे खरं बोलतात किंवा व्यक्त होण्याचा प्रयत्न करतात त्यांना तुरुंगात डांबले जाते किंवा त्यांना शिक्षा केली जाते. जेव्हा एखाद्या अन्यायाबद्दल प्रश्न विचारला जातो तेव्हा प्रश्न विचारणाऱ्या माणसालाच चुकीचे ठरवले जाते असं म्हणत तेजस्वी यादव यांनी भाजपावर टीका केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विसरले आहेत की ते चौकीदार असतील जनता ठाणेदार आहे असाही टोला यादव यांनी लगावला.

आता तेजस्वी यादव यांनी केलेल्या या टीकेला भाजपाकडून काय उत्तर दिले जाणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. राजदतर्फे गुरुग्राम या ठिकाणी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्याच रॅलीमध्ये तेजस्वी यादव यांनी ही टीका केली आहे.