नितीश कुमार यांनी आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर सलग चौथ्यांदा ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. यानंतर, त्यांच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घालणारे राजद नेते तेजस्वी यादव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री ‘नामनिर्देशित’ झाल्याबद्दल शुभेच्छा. असं तेजस्वी यादव म्हणाले आहेत.

”अपेक्षा करतो की खुर्चीच्या महत्वकांक्षे ऐवजी ते बिहारची जनकांक्षा व एनडीएच्या १९ लाख नोकऱ्या-रोजगार आणि शिक्षण, औषधी, उत्पन्न, सिंचन, सुनावणी सारख्या सकारात्मक मुद्दांना सरकारची प्राथमिकता बनवतील.” असं तेजस्वी यादव यांनी ट्विट मध्ये म्हटलं आहे.

पाटण्यातील राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपाचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

तसेच, जेडीयू नेते विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी आणि मेवालाल चौधरी यांनी तर हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख जितनराम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन आणि विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश साहनी यांनी बिहारच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

बिहार निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं आहे. एनडीएला १२५ तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

निवडणूक निकालाच्या दिवशीही तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेत ढवळाढवळ करत आहेत असा आरोप केला होता. महाआघाडीच्या विजयी उमेदवारांना पराभूत घोषित करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला होता. तर, जनमताचा कौल हा आमच्या बाजूनेच होता. मात्र निवडणूक आयोग एनडीएच्या बाजूने होता असं देखील तेजस्वी यादव म्हणाले होते.