बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नितीशकुमार यांना शपथ  सोहळ्यात भाजपविरोधक एकवटले
भाजपचा दणदणीत पराभव करत बिहारमध्ये सत्तेवर आलेल्या संयुक्त जनता दल व राष्ट्रीय जनता दलप्रणीत महाआघाडीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी एका भव्य शपथविधी सोहळ्यात पाचव्यांदा शपथ घेतली. गांधी मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास भाजपविरोधी पक्षांच्या अनेक दिग्गजांची मांदियाळीच एकवटली होती.
बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी नितीश यांच्यासह २८ मंत्र्यांना शपथ दिली. त्यात राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यांचे सुपुत्र तेजस्वी आणि तेजप्रताप यांचाही समावेश आहे. या वेळी जदयू व राजदच्या प्रत्येकी १२ व काँग्रेसच्या ४ मंत्र्यांनी शपथ घेतली. तेजस्वी यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवण्यात आले आहे. भाजपविरोधक एका व्यासपीठावर एकवटले होते. लोकसभेचे काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे सर्वेसर्वा फारूक अब्दुल्ला व त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला, राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख अजितसिंह, द्रविड मुन्नेत्र कळघमचे अध्वर्यू करुणानिधी यांचे पुत्र एम. के. स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हजेरी लावली. बहुतांश कॉँग्रेसशासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित होते. भाजपच्या वतीने संसदीय कामकाजमंत्री वेंकय्या नायडू यांनी हजेरी लावली होती. तर भाजपचे सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना व शिरोमणी अकाली दलाचे नेतेही या वेळी उपस्थित होते.
समाजवादी पक्षाच्यावतीने खासदार तेजप्रताप सिंह यांनी सोहळ्याला हजेरी लावली होती.
मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते
मुख्यमंत्री नितीशकुमार हे गृहखाते आपल्याकडेच ठेवणार असून त्यासोबत सामान्य प्रशासन आणि माहिती-जनसंपर्क विभागाचा कार्यभारही त्यांच्याकडेच राहील. तेजस्वी यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपविण्यात आले असून ते रस्तेबांधणी विभागाचे मंत्रिपद सांभाळतील.

कालचे विरोधक; आताचे जीवलग
एरवी राजकीय वाग्बाणांनी एकमेकांना घायाळ करणारे विरोधक या समारंभापुरते मात्र सख्खे शेजारी बनले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममतादीदी माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे केजरीवाल हेदेखील आपल्या एकेकाळच्या हाडवैरी व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासमवेत, आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई आपले कट्टर विरोधक व आसाम गण परिषदेचे नेते प्रफुल्लकुमार महांतो यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर हजर होते. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या रांगेत बसलेल्या राहुल यांनी लालूप्रसाद यांना कडकडून मिठीही मारली. जवळपास सर्वच नेत्यांनी नितीश व लालू यांची गळाभेट घेतली.

लालूपुत्राची चूक
लालूप्रसाद यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजप्रताप यांनी राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्याकडून मंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतेवेळी तेजप्रताप यांच्याकडून शब्द उच्चारणात दोनदा चूक झाली. पहिल्यांदा चूक झाल्यानंतर तेजप्रताप यांनी दुसऱ्यांदा शपथ उच्चारली. परंतु त्याही वेळी अगोदरच्याच चुकीची पुनरावृत्ती झाली. तेव्हा कोविंद यांनी हस्तक्षेप करत गोंधळलेल्या तेजप्रताप यांना संबंधित शब्द ‘उपेक्षित’ नव्हे, तर ‘अपेक्षित’ असल्याचे सांगितले.
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमार यांनी शुक्रवारी पाटणा येथे शपथ घेतली. लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी उपमुख्यमंत्री असून दुसरे पुत्र तेजप्रताप यांच्याकडे आरोग्य खात्याची धुरा देण्यात आली आहे.