बिहारचे माजी उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर कर्नाटक विधानसभा निकालावरुन निशाणा साधला आहे. मंगळवारी रात्री कर्नाटकाचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर नितीश कुमार यांनी भाजपाचं अभिनंदन केलं, त्यावरुन तेजस्वी यांनी नितीश कुमार यांना टोला लगावला.

कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष ठरल्याबद्दल भाजपाचं अभिनंदन, असं ट्विट नितीश कुमारांनी केलं होतं. या ट्विटला उत्तर म्हणून तेजस्वी यांनी , जरा सांगा मग, बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाचं नाव काय आहे ? असा सवाल केला. तसंच बिहारमध्ये भाजपाची साथ दिल्यावरुनही तेजस्वी यांनी नितीश यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. भाजपाला बिहारमध्ये कोणी पराभूत केलं होतं? आज बिहारमध्ये भाजपा कोणामुळे सरकारमध्ये आहे? असा प्रश्न त्यांनी नितीश यांना विचारलाय.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस दोन क्रमांकावर आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा जेडीएस हा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीएस येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या राज्यपालांची भेट घेवून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसने जेडीएसला समर्थन देण्याची घोषणा केली आहे.