तेलंगणामधील आदिलाबाद येथील भाजपा खासदार सोयम बापूराव यांनी मुस्लिम तरुणांचे गळे कापण्याची धमकी दिली आहे. सोयम बापूराव यांचा आरोप आहे की, आदिवासी जिल्ह्यात मुस्लिम तरुण आदिवासी महिलांचं शोषण करत आहेत, आणि आपण हे अजिबात सहन करणार नाही. दरम्यान मुस्लिम तरुणांना धमकी दिल्याप्रकरणी भाजपा खासदार सोयम बापूराव यांच्याविरोधात अल्पसंख्यांक नेत्यांनी तक्रार दाखल केली आहे.
अल्पसंख्यांक नेते साजिद खान यांनी आदिलाबादचे एसपी कंचा मोहन यांच्या उपस्थितीत सोयम बापूराव यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. साजिद खान यांनी हे वक्तव्य अत्यंत चुकीचं असल्याचं सांगत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. टीआरस नेते एम कृषंक यांनीदेखील वक्तव्याचा निषेध करत म्हटलं आहे की, नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास और सबका विश्वास संबंधी बोलतात, पण त्यांचेच नेते वादग्रस्त वक्तव्य करत तेलंगणात भाजपाचा मार्ग तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सोयम बापूराव याआधी तेलंगणा राष्ट्र समिती आणि काँग्रेसमध्ये होते. २००४ साली टीआरएसच्या तिकीटवर निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजपाने त्यांना तिकीट देण्याचं आश्वासन दिल्याने त्यांनी मार्च महिन्यात भाजपात प्रवेश केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 24, 2019 2:32 pm