वेगळ्या तेलंगणानिर्मितीचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मांडले जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सीमांध्र भागात कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. सीमांध्र भागात कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीसांसह निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. आंध्र प्रदेशच्या विभाजनाला सीमांध्र भागातील नेत्यांचा आणि नागरिकांचा विरोध आहे.
आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. जिल्ह्यातील पोलीसांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिस्थितीनुरूप आम्ही योग्य ती कारवाई करू, असे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही.एस. के. कौमुदी यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सीमांध्र भागात बंद पुकारण्यात येत आहे. त्याचबरोबर आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनेही करण्यात येत आहेत.
केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्यावर्षी वेगळ्या तेलंगणानिर्मितीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात आणि राययसीमा भागात सातत्याने आंदोलन करण्यात येते आहे. या निर्णयाविरोधात मोर्चे काढण्यात आले असून, वारंवार बंदही पुकारण्यात आला आहे.
दरम्यान, तेलंगणासमर्थकांनी लोकसभेमध्ये हे विधेयक चर्चेला येत असल्याचे स्वागत केले आहे.