करोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल मीडियावरून एकमेकांशी संवाद साधला जात आहे. मंत्री, अधिकारी ट्वीटरच्या माध्यमातून सक्रिय आहेत. प्रत्येक घडामोडीची माहिती आणि त्याबाबतच्या सूचना केल्या जात आहेत. मात्र तेलंगाणातील एका खवय्याने बिर्याणी लेग पीस नसल्याने थेट मंत्र्यांनाच तक्रार केली. ही तक्रार पाहून मंत्रीही चक्रावून गेले. हे ट्वीट पाहून एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी मजेशीर ट्वीट करत मंत्र्यांना मदत करण्याचं आवाहन केलं.

“मी चिकन बिर्याणी आणि एक्स्ट्रा मसाला आणि लेग पीसची ऑर्डर दिली होती. पण त्यात मला कुठेच काही दिसलं नाही. बिर्याणी देण्याची ही पद्धत आहे” असं ट्वीट थोटाकुरी रघुपथी याने केलं. त्याचबरोबर झोमॅटो आणि मंत्री केटीआर यांना टॅग केलं. मंत्री के टी रामा राव यांचं प्रोफाईल टॅग झाल्यानंतर त्यांनाही सुरुवातीला काही कळलं नाही. त्यानंतर त्यांनी ते ट्वीट रिट्वीट करत ‘यात मला का टॅग केलं?, मी यात काय करु शकतो’, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच विचार करणारा इमोजी त्या पोस्टमध्ये टाकला.

या ट्वीटनंतर एमआयएम खासदार असुदुद्दीन ओवैसी यांनी केटीआर यांना चिमटे काढत मजेशीर ट्वीट केलं. “केटीआर कार्यालयाला याचं उत्तर दिलं पाहीजे.” त्याचबरोबर पुढे त्यांनी केटीआर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही मारली “केटीआर आणि त्यांची टीम या करोनाकाळात लोकांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी चांगलं काम करत आहे”, असंही त्यांनी सांगितलं.

नेटकऱ्यांनीही या ट्वीटनंतर मजेशीर उत्तर दिली, लेग पीस अनिवार्य करा असं ट्वीट एका नेटकऱ्याने केलं. तर एकाने हा देश पातळीवरील प्रश्न असल्याचं सांगितलं.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर थोटाकुरी रघुपथी याने त्याचं ट्वीट डिलीट केलं. मात्र मंत्र्यांचं उत्तर तसंच असल्याने नेटकऱ्यांना आवरणं कठीण झालं आहे.