तेलंगणमधील निर्मल या मतदरासंघात प्रचार सभा घेऊ नये, यासाठी काँग्रेसकडून मला २५ लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. मला कोणीही विकत घेऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

तेलंगणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. तेलंगणातील ११९ जागांसाठी ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी निर्मल येथे प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेत त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले.

निर्मल विधानसभा मतदारसंघात एमआयएमने उमेदवार दिलेला नाही. या मतदारसंघात एमआयएमने तेलंगण राष्ट्र समितीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. या उमेदवाराच्या समर्थनार्थ ओवेसी यांनी सोमवारी सभा घेतली. ‘मी या मतदारसंघात सभा घेऊ नये यासाठी काँग्रेसने मला २५ लाख रुपयांची ऑफर दिली होती. माझ्याकडे याचा पुरावा म्हणून फोन रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे’, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसच्या या कृत्यावर तुम्ही काय म्हणाल. मला कोणीही खरेदी करु शकत नाही. काँग्रेस दुसऱ्या पक्षात फोडाफोडीचा प्रयत्न करत आहे. अशा पक्षाकडून तुम्हीकडून काय अपेक्षा ठेवणार, असा सवाल त्यांनी विचारला.