तेलंगणामधील प्रणय कुमार ऑनर किलिंग प्रकरणाची सध्या देशभरात चर्चा आहे. गर्भवती पत्नीसमोर तिच्याच वडीलांनी पाठवलेल्या मारेकऱ्यांनी तिच्या पतीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. नालगोंडा जिल्ह्यात रुग्णालयाबाहेर मागील शुक्रवारी म्हणजेच १४ सप्टेंबरला प्रणयवर हा जीवघेणा हल्ला झाला. यामध्ये प्रणयची गरोदर पत्नी अमृता हिने आपण प्रणयला न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याचे सांगितले आहे. सध्या या दोघांचा पोस्ट वेडिंग शूटचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

जानेवारीमध्ये घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केल्यानंतर शूट केलेल्या हा पोस्ट वेडिंग व्हिडीओ अगदी एखाद्या हिंदी सिनेमाच्या गाण्याला साजेश्या लोकेशनवर शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही आपल्या लग्नाच्या निर्णयाने खूष असल्याचे त्यांच्या प्रत्येक हावभावातून दिसत आहे. शालेय जिवनापासून एकमेकांच्या प्रेमात असलेल्या या दोघांनी अनेक अचडणींचा सामना करुन लग्न करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले होते. प्रणयची हत्या झाल्यानंतर अनेकांनी हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला असून पारंपारिक आणि बुरसटलेल्या विचारसरणीमुळे अमृताच्या घरच्यांनी या दोघांच्या सुखी संसाराला गालबोट लावल्याची भावना नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. लवकरच प्रणय आणि अमृताच्या आयुष्यात छोट्या पाहुण्याचे आगमन होणार होते मात्र त्याआधीच अमृताच्या वडीलांनी त्यांच्या होणाऱ्या बाळावरील पितृछत्र हिरावून घेतले. मला प्रणयच्या जीवापेक्षा माझी समाजातील प्रतिष्ठा जास्त महत्वाची असल्याचे सांगत आपण ही सुपारी दिल्याचे कबूल केले आहे.

प्रणय आणि अमृताने घरच्यांच्या इच्छेविरोधात जानेवारी महिन्यात लग्न केले. अमृताचे वडील टी मारुती राव हे रिअल इस्टेट क्षेत्रातील मोठे नाव आहे. श्रीमंत-प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो म्हणूनच आपल्या मुलीने प्रणयशी लग्न करणे तिच्या वडीलांना पटले नव्हते. अमृताच्या कुटुंबाचा या आंतरजातीय लग्नाला विरोध होता. तरी अमृताने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रणयशी जानेवारी महिन्यामध्ये लग्न केले होते.

हे ही वाचा >> तेलंगणा ऑनर किलिंग – पोलिसांना फसवण्यासाठी दृश्यम चित्रपटाप्रमाणे आखला होता प्लान

प्रणयवर आपल्याच वडीलांनी केलेल्या हल्ल्यामुळे अमृता हदरून गेली आहे. तरीही आपण प्रणयला न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याचे तिने सांगितले आहे. लग्नानंतर आम्हा दोघांना माझ्या कुटुंबाकडून धोका असल्यामुळे काही काळ आम्ही लपूनही राहिलो होतो. पण त्यानंतर आम्ही सामान्य आयुष्य जगत होतो. अचानक माझ्या घरचे अशाप्रकारे प्रणयची हत्या करतील अशी अपेक्षा केली नव्हती असे अमृताने सांगितले.

हे ही वाचा >> ऑनर किलिंगमधून हत्येसाठी १ कोटींची सुपारी, गँगचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध

प्रकरण काय

नालगोंडा जिल्ह्यात १४ सप्टेंबरला प्रणय अमृताला रुग्णालयात घेऊन गेला होता. त्यावेळी मारेकरी तिथे आला आणि त्याने धारदार शस्त्राने वार करुन प्रणयची हत्या केली. अमृताने पोलिसांना दिलेल्या जबानीत तिचे वडिल मारुती राव आणि काका श्रवण राव यांच्यावर संशय व्यक्त केला होता.
पोलिसांना या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असून पोलिसांनी बिहारमधून मारेकऱ्यासह एकूण सात जणांना अटक केली आहे. २३ वर्षीय प्रणय कुमारची हत्या करण्यासाठी या गँगला मुलीचे वडील टी मारुती राव १ कोटी रुपयाची सुपारी दिली होती.